नाशिक : राज्य शासनाच्या निर्देशानुसार भूमी अभिलेख विभागाच्या वतीने शहरातील प्रत्येक भागाचा सिटी सर्व्हे करण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांना ह्यप्रॉपर्टी कार्डह्ण उपलब्ध करून देण्यासाठीच नागरिकांकडून त्यांच्या घरांचे खरेदी खत, सातबारा, एन ए प्रमाणपत्र मागविण्यात आले आहेत. त्यामुळे नोटिसांबद्दल कोणताही गैरसमज करून न घेता नागरिकांनी त्यांच्या मालमत्तांची कागदपत्रे भूमी अभिलेखच्या पंडित कॉलनीतील कार्यालयात जमा करून स्वत:च्या मालमत्तेचे कायमस्वरूपी दस्तऐवज तयार करुन घ्यावेत, असे आवाहन भूमी अभिलेख विभागाच्या विशेष उपअधीक्षक रोहिणी दहीफळे यांनी केले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १०२ अन्वये ज्यांच्या नावावर घरांची मालमत्ता आहे, त्या मालमत्तांची चौकशी करून त्यांचे दस्तऐवजीकरण करणे तसेच संबंधित नागरिकांना त्या कागदपत्र पडताळणीनंतर त्या मालमत्तेचे प्रॉपर्टीकार्ड देणे ही नियमित प्रक्रिया आहे. नाशिकमध्ये भूमापनची तीन कार्यालये असून त्या माध्यमातून सध्या द्वारका आणि इंदिरानगरच्या परिसरातील नागरिकांना या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
त्यामुळे नोटीस ही नागरिकांच्या मालमत्तेचे प्रॉपर्टीकार्ड करून देण्यासाठीच असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता लवकरात लवकर कागदपत्रे दाखल करावीत. भविष्यात सर्व मालमत्तांचे सातबारा बंद होऊन केवळ सिटी सर्व्हेचे प्रॉपर्टीकार्डच मिळकत पत्रिका म्हणून नागरिकांना जपून ठेवले तरी पुरेसे होणार आहे.
त्यामुळे भविष्यासाठीची तरतूद म्हणून नागरिकांनी त्यांची कागदपत्रे सादर करून प्रॉपर्टी कार्ड मिळवावे, असे आवाहन देखील दहीफळे यांनी केले आहे. येत्या वर्षभरात गावठाणवगळता शहरातील सर्व भागांना अशा प्रकारच्या नोटिसा देऊन त्यांना प्रॉपर्टीकार्ड करून घेण्यासाठी सूचीत केले जाणार आहे.