नाशिकरोड : चार दिवसांपूर्वी झालेला मुसळधार पाऊस व गोदावरी, दारणा नदीला महापूर आल्याने नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये झालेल्या नुकसानीची आमदार योगेश घोलप यांनी अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून तातडीने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.चार दिवसांपूर्वी शहर व आजुबाजूच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे व धरण क्षेत्रातून पाणी सोडल्याने गोदावरी, दारणा नदीला महापूर आला होता. पुराचे पाणी शेतात व घरांमध्ये शिरल्याने शेती मालासह संसारोपयोगी साहित्यांचे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, तहसीलदार जयश्री अहिरराव, गटविकास अधिकारी कोल्हे यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक आदिंनी शुक्रवारी सोबत घेऊन लाखलगाव, कालवी, हिंगणवेढे, कोटमगाव, सामनगाव, मोहगाव, बाभळेश्वर, जाखोरी, चांदगिरी व पळसे आदि गावांमधील नुकसानग्रस्त शेती व घरांची पाहणी केली. यावेळी जगन आगळे, अनिल ढिकले, नगरसेवक केशव पोरजे, प्रकाश म्हस्के, संजय तुंगार, राहुल ताजनपुरे, योगेश भोर, सरपंच नवनाथ गायधनी, मंगला पगारे, माधुरी तुंगार, नंदु कटाळे, राजू अनवट, योगेश म्हस्के यांच्यासह ग्रामविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना
By admin | Published: August 07, 2016 1:34 AM