नाशिक : महापालिकेच्या कामकाजातील दिरंगाई विशेष करून टपालाचा निपटारा वेळेत न करण्यामुळे नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना अर्धशासकीय पत्रदेखील प्रशासनाने दिले आहे.महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दर मंगळवारी सुरू केलेली साप्ताहिक आढावा बैठक अचानक सोमवारी (दि.२८) घेतली. यावेळी आयुक्त गमे यांनी टपालातील प्रलंबित कामे तसेच ई-कनेक्ट अॅपमधील रेंगाळलेली कामे यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी ज्या ज्या खातेप्रमुखांकडून वेळेत कामाचा निपटारा झालेला नाही त्या सर्वांना समज देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुरेश निकुंभे यांना मात्र नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी कामगारनगरातील स्वागत हाईट्स या इमारतीची उंची न तपासताच पूर्णत्वाचा दाखला देण्याच्या प्रकारात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निकुंभे यांना तातडीने अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र निकुंभे यांनी तो सादर केलाच नाही. महासभेत स्वागत हाईट्सचा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा आयुक्तांनी कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांना यासंदर्भातील अहवाल देण्याचे आदेश दिले होते, परंतु त्यानंतर भंदुरे रुजू झाल्यानंतरदेखील हा अहवाल प्रलंबित आहे.
नगररचनाच्या सहायक संचालकांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 1:27 AM