मालेगाव : देवळा तालुक्यातील दहिवड येथील ग्रामपंचायतीच्या विविध कामात करण्यात आलेल्या अपहार प्रकरणी देवळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी जबाबदार असणाऱ्या शाखा अभियंता, ग्रामविकास अधिकारी, सरपंच आदिंना खुलासा सादर करण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.देवळा तालुक्यातील दहिवड येथील ग्रामपंचायतीत घरकुल योजना, क्रीडा खात्याच्या निधीचा अपहार, पाणीपुरवठा आदि योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार करण्यात आला होता. त्याविरोधात संजय देवरे यांनी ग्रामस्थांसह या प्रकारास वाचा फोडली. यासाठी काणाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात उपोषण, धरणे, रास्ता रोको आदि प्रकारचे आंदोलन करण्यात आले. यासर्व गोष्टींमुळे पंचायत समिती अधिकाऱ्यांना कारवाई करणे भाग पडले. या प्रकरणाची चौकशी करून सत्यता आढळल्याने गटविकास अधिकारी यांनी २८ आॅगस्ट २०१४ रोजी संबंधिताना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.शासनाची दिशाभूल केल्याचा व गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आल्याने तुमच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, याबाबत तीन दिवसाच्या आत योग्य त्या पुराव्यानिशी आपले म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या योजनेतील लाभार्थी सुदाम शिंदे व रंजना देवरे यांनाही नोटीस देण्यात आली आहे. यातील शिंदे यांना सदर घर खाली करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१२ रोजी नोटीस देण्यात आली असताना त्यांनी अद्याप खाली न केल्याने त्यांना शासकीय मालमत्तेचा बळजबरीने जाणीवपूर्वक ताबा घेतल्या कारणाने तीन दिवसात घरकुल खाली करावे अन्यथा पोलीस बंदोबस्तात खाली करण्यात येऊन सर्व खर्च वसूल करण्यात येईल तसेच पुढील सर्व परिणामांना जबाबदार धरण्यात येईल, अशा आशयाची नोटीस देण्यात आली आहे. यातील विशेष म्हणजे यातील एक लाभार्थी मयत झालेला असताना खोटे नातेवाईक असल्याचे दाखविण्यात आले असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले असून, अशा गैरप्रकार करणाऱ्यांनाही चौकशीची धास्ती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणातील एका घरकुलाला त्यातील सामान काढून गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामस्थ आदिंच्या उपस्थितीत सील लावण्यात आले असल्याची माहिती संजय देवरे यांनी दिली. (वार्ताहर)
अपहार प्रकरणी अधिकाऱ्यांना नोटीस
By admin | Published: September 10, 2014 10:13 PM