नाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर एक वाडा कोसळून दुर्घटना घडल्याने महापालिकेने तातडीने दुर्घटनेची दखल घेत शहरातील एक हजारांहून अधिक धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या आहेत. अर्थात, कोरोना संसर्ग वाढत असताना अशा प्रकारे घरातून स्थलांतरित तरी कोठे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात गावठाण भागाचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गावठाणात जुनी घरे आणि वाडे आहेत. अनेक वर्षांपूर्वीची हे वाडे धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाडे पडतात आणि प्रसंगी जीवितहानीदेखील होते. गेल्यावर्षी सुमारे २५ ते ३० वाडे पडले होते. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच एक धोकादायक घर पडले आणि आणि एकाचा बळीदेखील गेला आहे. त्यानंतर महापालिकेने आता धोकादायक वाडे हा विषय पटलावर घेतला असून, धोकादायक घरांना नोटिसा बजावण्याचे काम वेगाने पूर्ण केले आहे. महापालिकेच्या वतीने शहरात एक हजार ३२ घरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात सर्वाधिक म्हणजेच ५०८ घरे पश्चिम भागातील आहेत, तर जुन्या नाशकातील काझी गढीवरील ८३ जणांनादेखील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय पंचवटीत १८०, नाशिकरोड येथे १२८, पूर्व १०५, सातपूर ७०, सिडको विभागात ४१ याप्रमाणे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधितांना धोकादायक भाग उतरवून घेणे तसेच घर सोडून अन्यत्र स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले आहे. तथापि, सध्या कोरोनाची स्थिती बघता नागरिक घर सोडून अन्यत्र कोठे जाऊ शकतील याविषयी साशंकता आहे.
क्लस्टरचा प्रश्न प्रलंबितचशहरातील गावठाण भागातील वाड्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाने क्लस्टर योजना राबविण्याचे ठरविले आहे. मात्र, हा प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. महापालिकेचा आघात मूल्यमापन अहवाल वेळेत न पोहोचल्याने क्लस्टरचा विषय मार्गी लागलेला नाही. त्यामुळे नोटिसा बजावणे ठीक; परंतु महापालिकेनेदेखील गावठाणांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्लस्टरला चालना द्यावी, अशी मागणी होत आहे.