रेल्वे गेट बंद झाल्याने, रेल्वेने तयार करून दिलेल्या पर्यायी भुयारी मार्गातील अरुंद रस्त्याचा त्रास काही महिन्यांपासून सहन करणाऱ्या शहरवासीयांना नगर परिषदेने अखेर दिलासा देणारे पाऊल उचलून मटण मार्केटमधील व्यावसायिकांना सात दिवसांच्या आत ओटे/गाळे रिकामे करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.
प्रशासनाने दिलेल्या मुदतीत गाळे खाली करून न दिल्यास नगर परिषदेमार्फत कायदेशीर मार्गाचा अवलंब करून सदर ओटे/गाळे निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपणच जबाबदार राहाल असे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी बजावलेल्या नोटिसीत म्हटले आहे. रेल्वे गेट बंद झाल्याने रेल्वे प्रशासनाने बांधून दिलेला भुयारी बोगदा अरुंद व वाहतुकीच्या दृष्टीने गैरसोयीचा झाला आहे. नागरिकांना या बोगद्यातून ये- जा करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत आंदोलने करण्यात आली. वाहतूक नीट करण्यासाठी सदरील भुयारी मार्ग भोंगळे मार्गाला जोडणे अत्यावश्यक आहे. परंतु या कामात मटण मार्केटच्या इमारतीचा अडथळा निर्माण होत आहे.
तसेच सदरील ओटे सन २००९ पासून कोणताही करारनामा न करता मासिक भाडेतत्त्वावर व्यवसायासाठी देण्यात आले होते. ही जागा नगर परिषदेच्या मालकीची असून, नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता बनविणे आवश्यक असल्याने ओटेखाली करून द्यावे, असे नोटिसीत नमूद केले आहे.
इन्फो...
इमारतीमध्ये २१ ओटेधारक व ६ गाळेधारक असून, इमारतीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांबरोबर कोणताही करार नगर परिषदेने केला नव्हता. इमारतीमधील व्यावसायिकांना सध्या तात्पुरत्या स्वरूपात व नंतर कायमस्वरूपी गाळे/ओटे देण्याची तजवीज नगर परिषद प्रशासनाला करावी लागणार आहे.