फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पासून कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्यात कहर झाला होता. एकेका दिवसात पाच ते साडे पाच हजार कोराेना बाधित आढळत होते. त्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, मे महिन्याच्या प्रारंभापासून नव्याने बाधित होणाऱ्यांचे प्रमाण घटले असून त्या तुलनेत बरे होणाऱ्या रूग्णांची चढती कमान आहे. बुधवारी (दि.१२) एकाच दिवसात ५ हजार २२१ रूग्ण बरे झाले होते. गुरूवारी (दि.१३) ७ हजार ५१८ रूग्ण बरे झाले असून त्या तुलनेत २२७६ नवे बाधित आढळले आहेत. नाशिक शहरात तर ही संख्या पुन्हा एकदा चार आकड्यांच्या आत गेली असून दिवसभरात ९९९ नवे बाधित आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान दिवसभरात ३४ रूग्णांचा मृत्यू झाला असून त्यात नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भाागातील ३४ तर नाशिक शहरातील १२ आणि मालेगाव महापालिका क्षेत्रातील दोन रूग्णांचा समावेश आहे. या ३४ रूग्णांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या चार हजार पार गेली असून एकूण ४ हजार ४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
इन्फो..
नाशिकमध्ये उपचार घेणाऱ्यांमध्ये घट
नाशिक शहरात उपचार घेणाऱ्यांची संख्या घटत असून ११ मे रोजी १४,२०९, १२ मे रोजी १३,२४४ तर गुरूवारी (दि.१३) ही संख्या १० हजार ७३३ वर आली आहे. त्यामुळे शहरातील नवे बाधित आणि उपचार घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे.