नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याच्या तयारीला वेग आला असून, स्थायी समितीच्या पंधरा सदस्यांनी तयार केलेले विशेष महासभेची मागणी करणारे पत्र सोमवारी (दि. २७) नगरसचिवांना सादर केले जाणार आहे. त्यानंतर महापौर रंजना भानसी महासभेच्या अधिकृत तारखेची घोषणा करतील. महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांच्यातील बेबनाव कायम आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर अडीचशे कोटी रुपयांची रस्त्याची कामे रद्द केली. तेथून वादाची ठिणगी पडली. नगरसेवक निधी रद्द करणे, त्रिसूत्रीच्या निकषावर नगरसेवकांची कामे नाकारणे अशा अनेक प्रकारांमुळे बेबनाव वाढत गेला. आयुक्तांनी परस्पर मिळकत करात अवास्तव वाढ केली असा आरोप करीत नगरसेवकांनी विशेष महासभेतही करवाढ फेटाळली; मात्र आयुक्तांनी महासभेचा आदेशच बेकायदेशीर असल्याचे सांगून त्यावर कडी केल्याने वादाचा तो कळस अध्याय ठरला. अनेकदा प्रयत्न करूनही आयुक्त तुकाराम मुंढे लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत अशी नगरसेवकांची भावना असून त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र हा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे महापालिका अधिनियम ३६ (३) चा वापर करून आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचा प्रस्ताव अखेरीस तयार करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार स्थायी समितीच्या चार सदस्यांच्या स्वाक्षरीनिशी महापौरांना विशेष महासभा बोलविण्यासाठी पत्र देता येते; मात्र शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात स्थायी समितीच्या एकूण पंधरा सदस्यांनी सह्या केलेले पत्र आता तयार असून, सोमवारी (दि. २७) ते नगरसचिवांना सादर करण्यात येणार आहे. सदरचे पत्र प्राप्त झाल्यानंतर नगरसचिव विशेष महासभा बोलविण्याबाबत महापौरांना पत्र देऊन तशी विनंती करणार आहेत. त्यानंतर महापौर रंजना भानसी विशेष महासभा बोलवतील.भाजपाने सर्वपक्षीय मोट बांधून आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी केली असली तरी स्थायी समितीच्या सोळा पैकी पंधरा सदस्यांच्या सह्या झाल्या असून, समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांनी मात्र सही केली नसल्याचे वृत्त आहे.जनसुनवाई : आयुक्तांसाठी सरसावल्या एनजीओमहापालिका आयुक्तांच्या विरोधात नगरसेवकांनी दाखल केलेल्या ठरावाला अन्याय निवारण कृती समितीने पाठिंबा दर्शविला आहे. या समितीने करवाढीच्या विरोधात संघर्ष केला होता. दरम्यान, आयुक्तांच्या विरोधात वातावरण तापू लागले असताना काही सेवाभावी संस्था त्यांच्या समर्थनासाठी पुढे आल्या आहेत. या संस्थांनी एकत्रितरीत्या जनसुनवाई घेऊन आयुक्तांच्या भूमिका नागरिकांसमोर मांडण्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच याबाबत निर्णय होणार आहे.सेनेची भूमिका ठरणारअविश्वास ठरावाबाबत काय भूमिका घ्यावी, याबाबत शिवसेनेने थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मार्गदर्शन मागविले आहे. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी गेले दोन दिवस आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात व्यस्त असले तरी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी व जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यामार्फत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी हा विषय पक्षप्रमुखांकडे मांडला आहे. लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वासाची उद्या नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:59 AM