नाशिक : शहरातील कोरोनाबाधितांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होण्याची इच्छा असली तरी बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे महापालिकेने पोर्टल तयार केले आहे. मात्र त्यालाही चकवणाऱ्या दोन खासगी रुग्णालयांना महापालिकेच्या वतीने नेाटीस बजावण्यात आल्या आहेत. सीबीआरएस कार्यप्रणालीत भरती रुग्णांची नोंद वेळोवेळी न केल्या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी ही कारवाई केली आहे.
कोरोनाबाधितांना कोणत्या रुग्णालयांत बेड मिळतील याची माहिती देण्यासाठी महानगरपालिकेतर्फे सीबीआरएस कार्यप्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. परंतु काही खासगी रुग्णालय सीबीआर ए सिस्टीममध्ये रुग्णालयात दाखल रुग्णांची नोंद वेळोवेळी करत नाहीत. त्यामुळे या सिस्टीमवर बेड रिकामा आहे असे दिसते, परंतु वस्तुस्थितीमध्ये या बेडवर रुग्ण दाखल असतो. यामुळे नवीन कोरोना रुग्णांना बेड्स मिळत नाहीत. त्यामुळे महापालिकेने यांसदर्भात सिस्टीम तपासणी करून अचानक मेडीलिव्ह हॉस्पिटल व न्यू आधार हॉस्पिटल या दोन रुग्णालयात अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत थेटे यांनी अचानक पाहणी केली. शहरातील सर्व खासगी रुग्णालयांनी सीबीआर सिस्टीमवर भरती रुग्णाबाबतची खरी माहिती त्वरित अद्ययावत करावी अन्यथा रुग्णालयांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदीसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा सुरेश खाडे यांनी दिला.
इन्फो...
जादा बिलाची आकारणी तक्रार
गंगापूर रोडवर एका खासगी रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाइकाकडून दीड लाख रुपयांचे बिल आकारण्यात येत होते. मात्र त्यांची आर्थिक स्थिती तर चांगली नव्हतीच, शिवाय बिलदेखील जादा आकारल्याची तक्रार होती. मनसेचे माजी शहराध्यक्ष समीर शेटे यांनी यासंदर्भात हस्तक्षेप केल्यानंतर तब्बल चाळीस हजार रुपयांचे बिल कमी झाले. त्यामुळे त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली असून जादा बिल देणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने ऑडीटर्स नेमूनदेखील काही ठिकाणी उपयोग हेात नसल्याचे शेटे यांनी सांगितले.