नाशिक : महापालिकेने पाणीपट्टीच्या वसुलीकडे विशेष लक्ष केंद्रित केले असून, थकबाकीदारांना नोटिसा बजावत ४८ तासांच्या आत थकबाकीचा भरणा न केल्यास नळजोडणी खंडित करण्याचा इशारा दिला आहे.महापालिकेला पाणीपट्टी वसुलीत आजवर अपेक्षित यश मिळालेले नाही. यंदाही पाणीपट्टी वसुलीत महापालिका खूपच मागे आहे. वर्षानुवर्षांपासून पाणीपट्टी थकविणाºया नळजोडणी-धारकांविरुद्ध आता महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. संबंधितांनी ४८ तासांच्या आत थकबाकीचा भरणा न केल्यास त्यांच्या नळजोडण्या खंडित केल्या जाणार आहेत याशिवाय, दंडात्मक आकारणीही केली जाणार आहे. दरम्यान, गेल्या दीड वर्षापासून पाणीपट्टीची बिले ग्राहकांना मिळालेली नाहीत. त्यामुळे महापालिकेने आता पाणीपट्टीची बिले वाटपावर भर देण्यास सुरुवात केली आहे. पाणीपट्टीची बिले वाटपासाठी महापालिकेकडे पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. सद्यस्थितीत केवळ ११० कर्मचारीच प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असून, त्यांच्यावरही कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणीपट्टीच्या बिले वाटपाचे आउटसोर्सिंग करण्याचा विचार चालविला आहे. त्यासाठी लवकरच शासकीय ठराव महासभेवर आणला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर यांनी दिली आहे.
पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:11 AM