नाशिक : महापालिकेने घरपट्टी वसुलीसाठी आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, १० हजार रुपयांच्या वर थकबाकी असणाऱ्या सुमारे २० हजार मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. महापालिकेपुढे संबंधित थकबाकीदारांकडून ६६ कोटी रुपये वसुलीचे आव्हान आहे. महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीकडे आता अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीनंतर वसुलीला अधिक गती येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने थकबाकीदार मिळकतधारकांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू केली आहे. १० हजार रुपयांच्या पुढे थकबाकी असणाऱ्या २० हजार २९० मिळकतधारकांना महापालिकेने सूचनापत्रे पाठविली असून थकबाकी अदा न केल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. संबंधित मिळकतधारकांकडे महापालिकेची सुमारे ६६ कोटी ५३ लाख २९ हजार रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेच्या घरपट्टी विभागाने सातपूरमधील १२१८, नाशिक पश्चिम मधील १६५०, नाशिक पूर्वमधील ५०३८, पंचवटीतील ३७४८, सिडकोतील २३६३ आणि नाशिकरोड विभागातील ६२७३ थकबाकीदार मिळकतधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. महापालिकेने यापूर्वी वारंवार नोटिसा बजावूनही संबंधितांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी जप्ती मोहीम तीव्र केली होती, परंतु ती महिनाभरच चालली आणि नंतर थांबवली गेली. आता घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिकेने थकबाकीदारांकडे लक्ष केंद्रित केले असून, संबंधितांवर कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)
२०,००० मिळकतधारकांना नोटिसा
By admin | Published: October 27, 2016 12:42 AM