नाशिक : पावसाळा आला की महापालिकेच्या वतीने पूर्वतयारीचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या जातात, त्यानुसार यंदाही संपूर्ण शहरातील ३९७ मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, धोकादायक भाग उतरवून घेण्यास सूचित करण्यात आले आहे. तथापि, बहुतांशी नागरिक नोटिसांना प्रतिसाद देत नाही त्यातच गेल्यावर्षी तांबट लेन येथे वाडा पडून घडलेल्या दुर्घटनेत दोन जणांचा बळी गेल्यानंतरदेखील रहिवासी जागचे हलले नव्हते त्यामुळे महापालिकेच्या नोटिसांच्या सोपस्काराने काय होणार? असा प्रश्न केला जात आहे.संपुर्ण शहराच्या गावठाण भागातील जुने वाडे असून, अनेक वाडे शंभर-दीडशे वर्ष जुने आहेत. बहुतांशी वाडे धोकादायक झाले असून, ते पडण्याच्या स्थितीत आहेत. काही ठिकाणी भाडेकरू आणि घरमालक वाददेखील आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी नोटिसा बजावल्या जातात, परंतु त्याचा परिणाम अत्यंत नगण्य स्वरूपात होतो. यंदा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एकूण ३९७ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.यात पंचवटीत १५०, नाशिक पश्चिममध्ये १०३, नाशिक पूर्व विभागात ३९, नाशिकरोड विभागात ६७, सातपूरमध्ये १५ तर सिडको विभागात २३ अशा ३९७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पूर्व विभागात सर्वाधिक वाडे असताना अन्य विभागात संबंधितांनी धोकादायक भाग त्वरित उतरवून घ्यावेत, अन्यथा महापालिकेच्या वतीने असे धोकादायक भाग उतरवून संबंधितांकडून खर्च वसूल केला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.काजीगढीचा प्रश्न कायमगेल्या काही वर्षांपासून जुन्या नाशकातील काजीगढी ढासळू लागल्याने धोका वाढला आहे. महापालिकेने संबंधितांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न करून उपयोग झालेला नाही. पोलिसांमार्फत नोटिसा बजावूनही उपयोग झालेला नाही. आताही जिल्हा प्रशासनाने महापालिकेला पत्र दिले असून, काजीच्या गढीबाबत उचित कार्यवाही करण्याचे निर्र्देश दिले आहेत. महापालिका त्यावर काय भूमिका घेते हे महत्त्वाचे आहे.तांबट लेनमधील प्रश्न कायमगेल्यावर्षी तांबट लेनमध्ये वाडा पडल्यानंतर महापालिकेने संबंधिताना तेथे राहण्यास मनाई करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या. त्यावर कारवाई न झाल्याने पोलीस ठाण्यास पत्र दिले होते. परंतु पोलीस खात्यानेदेखील अंग काढून घेतले होते त्यामुळे नोटिसांच्या सोपस्कारापलीकडे काय होणार हा प्रश्न आहे.
आल्या नोटिसा, घरे खाली करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:25 AM