मालेगाव : शासनाच्या स्वच्छ भारत अभियान तसेच हगणदारीमुक्त गाव योजनेत कुचराई व हलगर्जीपणा करणाऱ्या येथील पंचायत समितीच्या तिघा अधिकाऱ्यांना व ११ ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर यांनी निलंबनाची व कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येथील पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंभरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या उपस्थितीत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)ची आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीत स्वच्छ भारत अभियानाचा आढावा घेण्यात आला. या अभियानात जिल्ह्यात मालेगाव तालुका मागे असल्याचे समोर आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी शंभरकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मालेगाव तालुक्यात १२४ ग्रामपंचायती आहेत तसेच ६८ हजार कुटुंबे आहेत. मार्चपर्यंत ५० टक्के ग्रामपंचायती हगणदारी मुक्त करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींमध्ये हगणदारीमुक्त अभियान राबविण्यात आले. उर्वरित ४४ ग्रामपंचायतींचे कामकाज सुधारले नसल्याचे बैठकीत उघडकीस आले. तालुक्यात आठ हजार ५०० वैयक्तीक शौचालये अद्यापही उभारले गेले नाही. वर्षअखेर केवळ दहा ग्रामपंचायतींनी उद्दीष्टे पूर्ण केली आहेत. संपूर्ण स्वच्छ अभियानात व हगणदारी मुक्त योजनेत येथील अधिकाऱ्यांनी असमाधानकारक काम केल्याचा ठपका ठेवत शंभरकर यांनी येत्या फेब्रुवारी महिनाअखेर तातडीने कामे पूर्ण केली नाही तर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ भारत अभियानात व हगणदारी मुक्त योजनेत संपर्क अधिकाऱ्यांनीही हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी शंभरकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी संगमनेरे यांनी गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांना संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. येत्या फेब्रुवारी महिना अखेर कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत गरमागरम चर्चा झाली. या धडक कारवाईमुळे पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांना नोटिसा
By admin | Published: January 22, 2017 12:27 AM