नाशिक : पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांना तातडीने धान्य उपलब्ध करून देण्यास नकार देणाऱ्या रेशन दुकानदारांना पुरवठा खात्याने परवाने रद्द का करू नये, अशा नोटिसा पाठवितानाच दुसरीकडे अपर आयुक्तांनी दुकानदारांची बैठक घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा केलेला प्रयत्नही अपयशी ठरला आहे. नोटिसा पाठवून प्रशासन जर रेशन दुकानदारांना धमकावित असेल तर सामूहिक परवाने परत करण्यास रेशन दुकानदार मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा संघटनेने दिला आहे. रेशन दुकानदार संघटनेचा राज्यव्यापी संप १ आॅगस्टपासून सुरू असून, दुसऱ्याच दिवशी नाशिक शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात तुफान पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले. या पुरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून रेशन दुकानातून शिधापत्रिकेवर धान्य उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले व त्यासाठी आमदारांच्या मध्यस्थीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी बोलविलेली बैठकही दोन दिवसांपूर्वी निष्फळ ठरली. या बैठकीत रेशन दुकानदारांच्या संघटनेमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट होत असतानाच, शुक्रवारी अपर आयुक्त रावसाहेब भागडे यांच्या उपस्थितीत पुन्हा पूरग्रस्तांच्या प्रश्नावर रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीतही दुकानदारांनी आपल्या मागण्यांवर कायम राहत, शासनाने मोफत धान्य उपलब्ध करून द्यावे, दुकानदार वाटण्यास तयार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पात्र नसलेल्या शिधापत्रिकाधारकांनी धान्याची मागणी केल्यास काय करायचे असे कळीचे प्रश्न उपस्थित केल्याने या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही, परंतु रेशन दुकानदार बधत नाही हे पाहून प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. रेशन दुकानदार ऐकणार नसतील तर गावोगावी असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत शिधापत्रिकाधारकांना धान्य दिले जाण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. या बैठकीस संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे, सतीश आमले, दिलीप तुपे, दिलीप मोरे, सलीम पटेल, महेश सदावर्ते आदि उपस्थित होते. मात्र या बैठकीनंतर शहरातील काही दुकानदारांनी नोटिसांना घाबरून धान्य उचलण्याची तयारी दर्शविल्याचेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
रेशन दुकानदारांना पाठविल्या नोटिसा
By admin | Published: August 06, 2016 1:11 AM