नाशिक : मुख्यमंत्री झाल्यानंतर ‘शासन तुमच्या दारी’या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या कालावधीत शिवसैनिकांकडून कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने नाशिक व मालेगावच्या शिवसैनिकांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. या नोटिसा मिळताच, शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांच्या अटकेच्या भीतीने काही भूमिगत झाले तर, काहींनी बाहेरगावी धाव घेतली आहे.
राज्यात शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सत्तांतर झाल्याची बाब शिवसैनिकांना मोठ्या प्रमाणावर खटकली असून, त्यातच या बंडखोरीत मालेगावचे आमदार दादा भुसे,नांदगावचे सुहास कांदे व नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे सहभागी झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यातूनच नाशिकसह जिल्ह्याच्या अन्य भागात मोर्चे काढून बंडखोरांचा विरोध व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्याचा दौरा करून नाशिकसह मनमाड येथे शिवसैनिकांचा मेळावा घेऊन सेेनेच्या बंडखोरांना चेतविले आहे. त्यामुळे जिल्ह्यात मूळ शिवसेना व बंडखोरांची शिवसेना असा वाद सुरू झाला असून, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. ठाण्याहून रस्ता मार्गे ते नाशिकहून,मालेगावकडे मोटारीने प्रयाण करणार असल्यामुळे त्यांच्या मार्गावर शिवसैनिकांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नाशिक व मालेगाव येथील पोलिसांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याचा उल्लेख करून या दौऱ्यात आपण किंवा आपल्या सहकाऱ्यांकडून आंदोलन, निदर्शने किंवा इतर अनुचित कृत्य घडवून आणल्यास जबाबदार धरण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्या विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी थेट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जावून नोटिसा बजावल्या तसेच घरी जावून पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलविण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांची कारवाई होईल या भीतीने काही पदाधिकाऱ्यांनी बाहेरगावचा रस्ता धरला तर काही भूमिगत झाले आहेत. मात्र या नोटिसांमुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.