सिडको : महानगरपालिकेच्या नगरनियोजन विभागाने सिडकोतील सह्याद्रीनगर, अश्विन सेक्टर परिसरात अनधिकृत बांधकाम केलेल्या नागरिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावून येत्या पंधरा दिवसात खुलासा करण्याची मुदत दिली असून, त्यानंतर बेकायदेशीर बांधकामे पाडून टाकण्याची कारवाई करण्याचा इशारा दिल्याने रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अनधिकृत बांधकामाबाबत केलेला खुलासा समाधानकारक नसल्यास कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीर बांधकामे पाडून टाकण्यात येईल व त्यासाठी आलेल्या खर्चाची वसुलीही रहिवाशांकडूनच करण्यात येईल, असेही या नोटिसीत नमूद केल्यामुळे हजारो रहिवाशांची धावपळ उडाली आहे. यासाठी त्यांनी तातडीने सोमवारी आमदार सीमा हिरे यांची भेट घेऊन निवेदन दिले व शासनाकडून बांधकामे नियमित करण्यात यावे, असे साकडे घातले. त्यावर हिरे यांनी नागरिकांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतले. यापूर्वीही मनपाने सिडकोतील घरांवर कोणतीही पूर्वसूचना न देता लाल रंगाच्या फुल्या मारल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगितीही मिळविलेली असताना महापालिकेने पुन्हा सिडकोच्या घरांना नव्याने नोटिसा दिल्यामुळे नागरिकामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सदरची अतिक्रमणे नियमित करून घेण्यासाठी (कंपाउंडिंग पॉलिसाचा) देखील विचार केला जाईल, असे आश्वासन हिरे यांनी दिले. यावेळी सुरेश जाधव, रंगरेज, अक्षय जोशी, के. के. पवार, विष्णू काळे, विठ्ठल फड, सुरेश पाटील, बाळासाहेब खताळे, उत्तम काळे, बाळा दराडे, अमोल भोसले आदी नागरिक उपस्थित होते.
सिडकोत अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:48 AM