नाशिक- शहरात स्मार्ट सिटी कंपनीने रस्त्याच्या कडेला पट्टे मारून सुरू केलेल्या स्मार्ट पार्कींगसाठी येत्या नोव्हेंबरपासून शुल्क आकारले जाणार आहे. नाशिकस्मार्ट सिटी लिमीटेड कंपनीच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विधान सभा निवडणूकीनंतर नागरीकांना या भुर्दंडाला सामोरे जावे लागणार आहे.
नाशिक शहरात स्मार्ट सिटी कंपनीने २८ ठिकाणी आॅन स्ट्रीट पार्कींग सुरू केली असून सध्या या ठिकाणी पैसे वसुल केले जात नसले तरी लवकरच ही वसुली सुरू होणार आहे. सध्या शहरात रहदारीच्य मार्गावर कंपनीने अचानक पट्टे मारले असून त्यामुळे दुकानदार वैतागले आहेत. नागरीकांना दुकानात दोन मिनीटासाठी जायचे असली आधी तरी भुर्दंड सोसावा लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून या सर्व ठिकाणी प्रायोगिक तत्वावर सेन्सरने वाहन तपासले जातात त्याच बरोबर पावत्याही दिल्या जात आहेत परंतु शुल्क वसुल केले जात नाही. आज कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. मात्र विधान सभा निवडणूकीत भाजपाच्या उमेदवारांना या विषयावर रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने निवडणूकीनंतर म्हणजे नोव्हेंबर पासून वसुली सुरू करावी असे ठरविण्यात आल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.