- संजय पाठक नाशिक- नाशिकच्याविमानतळावरील प्रवासी सेवेला वाढता प्रतिसाद आणि आगामी काळातील कुंभमेळा यामुळे नाशिकला ओझरविमानतळावर सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्सने घेतला असून या धावपट्टीसाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यांनी १६ जुलै २०२४ व २१ जानेवारी २०२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत या धावपट्टीला मंजुरी देण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या पडताळणी सुविधेसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्सला मान्यता दिली आहे.यामुळे भविष्यात नाशिक विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवाही सुरू करणे शक्य झाले आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने या नवीन धावपट्टीच्या निर्मितीसाठी २०० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे.
या धावपट्टीचे काम पूर्ण होण्यास साधारणतः २ वर्षांचा कालावधी लागणार आहे.नवीन धावपट्टी ही सध्याच्या धावपट्टीप्रमाणेच ३ किलोमीटर लांब व ४५ मीटर रुंद असणार आहे. २०२२ साली धावपट्टीची डागडुजी सुरू असताना तब्बल १४ दिवस नाशिकचे विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. नवीन धावपट्टीच्या निर्मितीनंतर डागडुजी सुरू असतानाही विमानतळ सक्रिय ठेवणे शक्य होणार आहे.