नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक, मालेगाव अहमदनगर, संगमनेर, जळगाव या भागातील कुरण वनक्षेत्र विकासाच्या दृष्टीने तेथील सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षकांची विभागीय कार्यशाळा ममदापूर-राजापूरमध्ये गुरुवारी घेण्यात आली. या कार्यशाळेत सेवानिवृत्त वनसंरक्षक तथा कुरण अभ्यासक सुभाष बडवे यांनी उपस्थितांना गवताची लागवड पद्धती, प्रजातींचा विकास, बिया संकलन, गवताचे महत्त्व समजावून दिले. यावेळी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, श्वेता रेड्डी, सहायक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे, वनक्षेत्रपाल संजय भंडारी, संजय पवार यांसह वनधिकारी व वनरक्षक उपस्थित होते.
जैवविविधतेच्या समृद्धतेसाठी गवताळ प्रदेश, माळरानांची भूमिका महत्त्वाची ठरते. यामुळे राज्यातील सर्वच वनवृत्तांमधील गवत कुरण विकसित करण्याचा प्रस्ताव सरकारने वनविभागापुढे ठेवला आहे. यादृष्टीने नाशिक वनवृत्ताकडून पहिली एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. काळवीट, साळींदर, रानडुक्कर यांसारख्या तृणभक्षी वन्यजीवांना तसेच पक्ष्यांच्या विविध प्रजातींना किड्यांचे खाद्य उपलब्ध होणार आहे. अन्नसाखळी सक्षम करण्यासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे.
--इन्फो--
या प्रजातींचा विकास
ममदापूर संवर्धन वनक्षेत्रात शेडा, मोठा पवण्या, लहान पवण्या, दिनाना, छोटा पवण्या, डोंगरी यांसारख्या गवताच्या प्रजातींचा पहिल्या टप्प्यांत विकास केला जाणार आहे. सध्या असलेल्या गवतामध्ये वरील प्रजातींचे गवत कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. बियांपासून रोपे तयार करून त्यांची लागवड केली जाणार आहे. यामुळे काळविटांना वैविध्यपूर्ण पद्धतीचा चारा खाण्यास वाव मिळेल, असा वनविभागाचा दावा आहे.
---कोट--
गवत कुरण चांगल्याप्रकारे विकसीत झाल्यास जमिनीची धूप थांबते. ममदापूर, चांदवड वनक्षेत्रातील माळरानावर गवताच्या स्थानिक विविध प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे. लागवडीनंतर चार ते पाच महिन्यांमध्ये कुरण विकास दिसेल. पूर्व वनविभागाच्या विविध वनपरिक्षेत्रांकडून बियांचे संकलनही करण्यात आले आहे. काळविटांची संख्या आणि सुदृढता वाढीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.
-तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक, पूर्व वनविभाग
------
फोटो आर वर १२फॉरेस्ट/ १२फॉरेस्ट१ नावाने सेव्ह आहे.