नाशिक : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उमेदवारनिहाय मतदानाची आकडेवारी जाहीर झाल्यामुळे गेल्या वर्षभरापासून विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर तयारीला लागलेल्या सत्ताधारी पक्षाच्या इच्छुकांना घुमारे फुटले असून, लोकसभेच्या आकड्यांची मोड करून आपल्या सोयीसाठी सुरक्षित मतदारसंघाचा शोध सुरू झाला आहे, तर विरोधी पक्षांना मोठा धक्का बसल्यामुळे तूर्त तरी त्यांच्या गोटात सामसूम दिसत आहे.नाशिक जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघाबरोबरच धुळे मतदारसंघाला जोडलेल्या तीन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिले गेले. लोकसभेच्या उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ पिंजून काढला असला तरी, विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी आपल्या स्वत:च्या दृष्टीने या निवडणुकीचा वापर करून घेतला. लोकसभेचा प्रचार करतानाच विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून ते मतदारांना सामोरे गेले. त्यामुळे त्यांची मतदार संघात एक फेरी पूर्ण झाल्याचे मानले जात आहे. आता मात्र लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन राजकीय पक्षांच्या उमेदवारांना विधानसभानिहाय पडलेली मते जाहीर झाल्याने प्रत्येक मतदारसंघातील मतदारांचा राजकीय कल समोर आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आड विधानसभेची तयारी करणाऱ्या इच्छूकांना घुमारे फुटू लागले असून, लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केंद्रनिहाय किती मते मिळाली याची माहिती गोळा करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत युतीच्या बाजूने स्पष्ट कौल मिळाल्यामुळे विधानसभा निवडणुकीची सर्वाधिक घाई सत्ताधारी पक्षांतील इच्छुकांना झाली असून, युतीच्या बाजूने सध्याचे अनुकूल वातावरण पाहता लवकरच विद्यमान सरकार बरखास्त करून मुदतपूर्व निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर लोकसभेचा उमेदवार निवडून येण्यासाठी विधानसभा मतदारसंघात आपण कसे योगदान दिले याच्या कथाही रंगवून सांगितल्या जात आहेत.गुरुवारी मतमोजणी सुरू असताना यातील काही इच्छुकांमध्ये मतदानाचा कौल पाहून तो पक्षश्रेष्ठींना कळविण्यासाठी चढाओढ पहावयास मिळाली, तर काहींनी शुक्रवारीच पक्षाच्या नेत्यांना भेटीसाठी वेळ मागितल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेसाठी इच्छुक असताना उमेदवारी मिळाली नाही, म्हणून विधानसभेसाठी उमेदवारी निश्चित असल्याचा दावाही काही इच्छुकांनी करण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी पक्षात विधानसभेसाठी इच्छुकांनी तयारी चालविली असताना, विरोधी पक्षात मात्र सामसूम आहे. जिल्ह्यातील मतदारांनी युतीच्या बाजूने कौल देतानाच मताधिक्क्यदेखील वाढवून दिल्याने विरोधी पक्षाच्या विद्यमान आमदारांमध्ये धडकी भरली असून, इच्छुकांनी तर आपल्या हालचालीच आवरत्या घेतल्या आहेत.संपर्क मोहिमा सुरूविधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराबरोबर प्रचार केला आणि त्या माध्यमातून संपर्क वाढवला आहे. काहींनी तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारमोहिमांमध्येच मतदारांना आपण विधानसभेसाठी इच्छुक असून, त्यासाठी लक्ष पुरविण्याचे आवाहन केले.
आता इच्छुकांचे लक्ष विधानसभेच्या तयारीकडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 1:24 AM