नाशिक : अमरधाममध्ये मृतदेह नेणाऱ्यांना वेटिंगवर राहावे लागते. पुरेशी माहिती नसल्याने तेथे गेल्यावर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे कळते. मृतदेह बरोबर आणलेला आणि अंत्यसंस्काराला विलंब अशावेळी नागरिकांची कोंडी होती. त्यावर नाशिक महपाालिकेने आता ॲपचा तोडगा काढला आहे. त्यामुळे स्मशानभूमीतील बेडची स्थिती आणि अन्य माहिती या ॲपवर मिळेलच, परंतु आगाऊ टाइम स्लॉटही बुक करता येणार आहे. नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्य वाढत असताना मृत्युदरही वाढला आहे. १ ते १६ एप्रिलपर्यंत नाशिक शहरातील अमरधाममध्ये १७९३ कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर उपचार करण्यात आले. कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास अन्य कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी विद्युत किंवा डिझेल शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचे आदेश आहेत. मात्र, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मेाठ्या प्रमाणात कोेरोनाबाधितांचे मृत्यू झाले आणि त्यानंतर अमरधाममध्ये तीन तीन दिवसांचे वेटिंग सुरू झाल्यानंतर अखेर महापालिकेने लाकडाच्या मदतीने पारंपरिक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यासदेखील मान्यता दिली. शहरात १७ अमरधाम आहेत. त्यात सत्तर बेड आहेत. गेल्या काही दिवसांत मृतांचा आकडा कमी झाला असला तरी चाळीस ते पन्नास बळी रोजच होत आहेत. त्यातच नाशिक आणि पंचवटी अमरधाममध्येच अंत्यसंस्काराला प्राधान्य दिले जाते. तेथे लागणारा वेळ बघता अन्य कोणत्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे ठरवले तर त्याबाबत नागरिकांना माहितीही नसते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आता ॲप तयार करण्याचे आदेश दिले आहेत. ॲपवर असणार अद्ययावत माहितीया ॲपवर शहरातील स्मशानभूमींची सर्व अद्ययावत माहिती असेल. कुठल्या स्मशानभूमीत बेड आहेत, त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नोंदणी झाली आहे काय, याबाबत माहिती असेल; परंतु त्याचबरोबर एखाद्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी जायचे असेल तर त्यासाठी अमरधाममध्ये न जाताही मोबाईल ॲपवरून नोंदणी करता येईल, त्यासाठी मृत्यूचे प्रमाणपत्र नोंदवणे आवश्यक राहील, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
आता स्मशानभूमीचे बुकिंगही ॲपवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 1:02 AM
अमरधाममध्ये मृतदेह नेणाऱ्यांना वेटिंगवर राहावे लागते. पुरेशी माहिती नसल्याने तेथे गेल्यावर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे कळते. मृतदेह बरोबर आणलेला आणि अंत्यसंस्काराला विलंब अशावेळी नागरिकांची कोंडी होती. त्यावर नाशिक महपाालिकेने आता ॲपचा तोडगा काढला आहे.
ठळक मुद्देनवीन सुविधा : अमरधाममधील प्रतीक्षा थांबणार