लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील पेट्रोलपंपांना यंत्राच्या चीप बसवून केल्या जाणाऱ्या इंधन चोरीचे लोण राज्यात पसरल्यानंतर ठाणे पोलिसांकडून ठिकठिकाणच्या पेट्रोलपंपांची होत असलेली तपासणी पाहता इंडियन आॅईल या तेल कंपनीने स्वत:हून पुढे होत इंधन मोजण्यासाठी मापे तसेच त्याच्या दर्जाची खात्री करण्यासाठी ‘फिल्टर’ पेपरचे वाटप सुरू केले आहे. कंपनीने या उपक्रमाला ‘चेक अॅण्ड वीन’ असे नाव दिले आहे. गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे देशभरातील वाहनचालकांचे डोळे खाड्कन उघडले असून, अगोदरच पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत असताना त्यात पैसे मोजूनही पुरेसे इंधन पेट्रोलपंपांवरून टाकले जात नसल्याची बाब सर्वच पेट्रोल पंपचालकांना संशयाच्या भोवऱ्यात उभी करणारी ठरली आहे. ठाणे पोलिसांनी यासंदर्भात पुणे, ठाणे, डोंबिवली, शहापूर, नाशिक या ठिकाणी छापे मारून केलेल्या पेट्रोलपंपांच्या तपासणीत विविध तीन तेल कंपन्यांचे पंप दोषी आढळून आल्याने त्यांना सील ठोकण्यात आले आहे. तपासणी पथकांनी पेट्रोलपंपांवरील यंत्राची तपासणी केली असता त्यात पंपचालकांनी फेरफार केल्याचे आढळून आल्याने काही पंपांचे ‘पल्सर कार्ड’ तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना त्यांनी मोजलेल्या दामाइतके दर्जाप्राप्त इंधन मिळावे, यासाठी कंपन्यांनीही आता आग्रह धरला आहे. त्यासाठी प्रत्येक पंपचालकाला इंधन मोजण्याचे पाच लिटरचे माप तसेच फिल्टर पेपरचे वाटप इंडियन आॅईलने सुरू केले आहे. या पेपरद्वारे इंधनाचा दर्जा ग्राहकांना तपासता येणार आहे.
आता फिल्टर पेपरद्वारे तपासा इंधनाचा दर्जा
By admin | Published: July 09, 2017 12:42 AM