सिडको : तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा भोगणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा अर्थात मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मोहीम नाशिक शहर पोलिसांनी हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांचीही 'कुंडली' काढली जात आहे. येत्या काही दिवसांत अंबड, सिडको भागातील बहुतांश सराईत गुन्हेगारांवर 'मोक्का' लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खून, दरोडा, जबरी चोरी ,लूटमार आदींसह इतर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व त्यांनी गुन्हा केल्यानंतर त्यांना किमान तीन वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक शिक्षा भोगलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशान्वये संघटित गुन्हेगारी (मोक्काअंतर्गत) कारवाई करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अशा गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ही कारवाई होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. नाशिक शहरासह अंबड पोलीस ठाणे हद्दीत यापुढील काळातही शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावा यादृष्टीने यापुढील काळात पोलिसांकडून अधिक कडक पावले उचलण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सराईत गुन्हेगार असलेल्या गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी मोक्कांतर्गत कार्यवाही करण्याचे काप सुरू आहे. याबरोबरच कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या इतर गुन्हेगारांचा ही पोलिसांकडून शोध सुरू असून, त्यांनाही तडीपार करण्याची मोहीम हाती घेतले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
कोट ..
पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा भोगणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी मोक्कांतर्गत कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे .येत्या काही दिवसांत याबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाणार असून, यानंतर कारवाई केली जाणार आहे
-कुमार चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक