नाशिक : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लागू असलेले निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असून, आता किराणा दुकाने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर आळा घालण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर वेळेचे बंधन घालण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एका शासकीय आदेशान्वये दिली आहे.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. मात्र अजूनही बाजारातील गर्दी कमी होत नसल्याने त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना वगळता इतर बाबींच्या आस्थापना बंद करण्याचे आदेश यापूर्वी पारित केलेले आहेत. सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ आणि शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ या कालावधीत योग्य कारणाशिवाय व परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीस फिरण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
जीवनाश्यक वस्तूंची सर्व दुकाने, आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र मेडिकल, वैद्यकीय आस्थापना २४ तास सेवा पुरवू शकतील. आता किराणा व भूसार मालाची दुकाने शनिवारी व रविवारी पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या किराणा दुकानांमधून दूध अथवा भाजीपाला विकला जातो त्यांनी आपली दुकाने बंद ठेवून टेबलद्वारे दूध व भाजीपाला विकण्यास संबंधित दुकानदारास परवानगी राहणार आहे. पूर्णपणे केवळ दूध, भाजीपाला विकणारी दुकाने शनिवारी व रविवारी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहतील.
अत्यावश्यक सेवेतील वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक व्यवस्था सुरू ठेवण्यात आली असल्यामुळे या क्षेत्राशी निगडित टायर विक्री, रिपेअर वर्कशॉप, सर्विस सेंटर आणि स्पेअर पार्ट विक्री आस्थापना सर्व दिवस (आठवडाभर) सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहतील, त्यासाठी त्यांना संबंधित पोलीस स्टेशनची परवानगी आवश्यक असणार आहे. मात्र वॉशिंग सेंटर आणि कार डेकोर इतर संबंधित आस्थापना बंद असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली आहे.