देवळाली मतदारसंघाची निवडणूक ही नेहमीच बबनराव घोलप विरुद्ध इतर पक्ष अशीच लढली गेली आहे. मतदारांच्या दृढ पाठिंब्यामुळे घोलप हे गेल्या २५ वर्षांपासून या मतदारसंघावर अधिराज्य गाजवित आहेत; परंतु घोलप यांना आता न्यायालयानेच निवडणूक लढण्यास अपात्र ठरविल्याने राष्ट्रवादी आणि मनसेच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत. घोलप रिंगणात नसल्याची हीच सुवर्णसंधी समजून ‘आता नाही, तर कधीच नाही’ असे म्हणत राष्ट्रवादी, भाजपा आणि रिपाइंनेदेखील इतिहास घडविण्याची भाषा सुरू केल्याने सेनेला यंदाची निवडणूक सोपी राहिलेली नाही. मोदी लाटेमुळे भाजपा जोमात आहे. महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने यापूर्वीच सेनेला धक्का देत देवळाली मतदारसंघाची मागणी केलेली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी हा मुद्दा अद्यापही सोडलेला नसल्याने सेनेचे नवखे उमेदवार घोलपपुत्र योगेश घोलप यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीतील दुसरा घटक पक्ष रिपाइंनेदेखील राखीव मतदारसंघात समाजाला प्रतिनिधित्व मिळावे असा दावा केल्याने मतविभागणीचा धोका महायुतीला पत्करावा लागेल. या संधीचा फायदा उचलण्यासाठी राष्ट्रवादी आपला राजकीय अनुभव पणास लावेल यात शंका नाही. राखीव मतदारसंघ असतानाही समाजाचा आमदार नसल्याची सल रिपाइंमध्ये आहे. त्यामुळे दिवंगत माजी आमदार भिकचंद दोंदे यांच्या नावाने भावनिक आवाहन केले जात असल्याने, रिपाइं ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मनसे-रिपाइंचा चर्चेत चेहरा रिंगणात उतरविण्याच्या तयारीत असल्याने यंदा येथून चुरस बघायला मिळेल हे निश्चित. २००९ मधील लोकसभा आणि गेल्या विधानसभेत मनसेला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे मनसेला येथून जनाधार मिळण्याची अपेक्षा आहे. येथील मतदारांनी आणि सेनेच्या मित्रपक्षांनी केवळ आमदार घोलप म्हणून निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली नव्हती; परंतु आता सेनेला गड राखण्याची चिंता असेल. घोलपांना झालेली शिक्षा, शिर्डीतून गेलेली खासदारकी आणि अपात्रतेचा ठपका याचे भांडवल आगामी विधानसभेत होईल यात शंका नाही. त्यातच योगेश घोलप हे नवखे उमेदवार असल्याने ही संधी म्हणून राष्ट्रवादीसह इतर साऱ्याच पक्षांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतल्याने सेनेची चिंता नक्कीच वाढणार आहे. शिवसेनेत सारेच एकवटलेबबनराव घोलप यांची आमदारकी गेली, खासदारकीच्या निवडणुकीतूनही परतावे लागले. त्यामुळे येथील मतदारांनी भावनिक आणि प्रतिष्ठेचा मुद्दा करीत त्यांचे पुत्र योगेश घोलप यांच्या नावावर एकमत केले आहे. सेनेत सध्यातरी दुसरे नाव नाही. मात्र माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया यांनी पुन्हा एकदा सेनेकडून आमदारकीची अपेक्षा व्यक्त केली आहे. अलीकडेच त्यांची कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी जवळीक वाढल्याने मेहरोलिया ऐनवेळी उमेदवारी खेचून आणू शकतात. दुसरीकडे योगेश घोलप यांच्यासाठी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर प्रयत्नशील आहेत. गेल्या २५ वर्षांपासून या मतदारसंघात घोलप यांचेच अधिराज्य आहे. त्यामुळे राखीव गटातील दुसरी फळीच निर्माण होऊ शकली नाही. परिणामी योगेश घोलप प्रबळ दावेदार आहेत; शिवाय घोलपांची आमदारकी राजकीय षडयंत्रातून गेल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात असल्याने सेना कार्यकर्ते एकवटले आहेत. भाजपाकडूनही प्रबळ दावामतदारसंघ अदलाबदलीत देवळाली मतदारसंघ भाजपाला मिळावा यासाठी स्थानिक भाजपाने जोरदार मागणी लावून धरली आहे. बबनराव घोलप विद्यमान आमदार असल्याने दरवेळी त्यांच्यासाठी भाजपाने आग्रह धरला नाही; परंतु आता बबनराव घोलप उमेदवारच नसल्याने भाजपाने दावा अधिक मजबूत केला आहे. सेना-भाजपा युती असताना, भाजपाला देवळालीत पक्षवाढीसाठी जर संधीच मिळणार नसेल आणि कार्यकर्त्यांना वाव मिळालाच नाही तर पक्षाची वाढही खुंटण्याचा धोका असल्याचे कारण पुढे करीत स्थानिक भाजपाने देवळालीवरील आपला दावा सोडलेला नाही. भाजपाकडून सध्या तरी कुणाल वाघ वगळता दुसरे नाव नाही. मात्र बदल झाल्यास अनेक उमेदवार भाजपाकडे वळतील अशी भाजपाला अपेक्षा आहे. ...तर मैत्रीपूर्णची तयारीराखीव मतदारसंघ असतानाही रिपाइंचा उमेदवार आमदार होऊ शकत नसेल तर किती दिवस वाट पाहणार, असा प्रचार आता रिपाइंने सुरू केला आहे. यात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आघाडीवर आहेत. घोलप यांच्यावर भ्रष्टाचाराचे सिद्ध झालेले आरोप, घराणेशाहीचा होणारा आरोप आणि एकाच घरात सत्ता एकवटल्याचे भांडवल होऊन महायुतीच्या हातून जागा जाऊ नये यासाठी लोंढे यांनी देवळालीची जागा रिपाइंला सोडावी यासाठी तगादा लावला आहे. महायुतीचा धर्म पाळण्याची वेळ आली, तर प्रसंगी मैत्रीपूर्ण लढत करण्याची तयारीदेखील लोंढे यांची आहे. त्यामुळे महायुतीत आलबेल आहे असे सध्यातरी चित्र नाही. विशेष म्हणजे, लोंढे यांनी पश्चिमपेक्षा देवळालीतून लढण्यास प्राधान्य दिले आहे. लोंढे यांच्याबरोबरच रिपाइंकडून विश्वनाथ काळे, सुनील वाघ हेही आशावादी आहेत. रिपाइंचे काही स्थानिक मात्र निव्वळ लढण्याची ‘हौस’ भागविण्यापुरते तयारीत आहेत. राष्ट्रवादीमध्ये भाऊगर्दीसेनेला येथे नेहमीच टक्कर देणाऱ्या राष्ट्रवादीच्या अपेक्षा यंदा वाढलेल्या आहेत. बबनराव घोलप रिंगणात नसल्याने सेनेचा नवखा उमेदवार योगेश घोलप यांना टक्कर देत यंदा इतिहास घडविण्याचा मनसुबा राष्ट्रवादीने आखला आहे. आता हीच संधी मानून अनेकांनी बाशिंग बांधले आहे. त्यामुळे योगेश यांच्यासमोर तरुण चेहरा द्यावा की मातब्बर उमेदवाराला उतरावे, हाच काय तो राष्ट्रवादीपुढे पेच आहे. गेल्या विधानसभेत दुसऱ्या क्रमांकावर असलेले नानासाहेब सोनवणे यांचे नाव आघाडीवर आहे. त्याबरोबरच मातंग समाजाचे नेते आणि जिल्हा बॅँकेचे व्यवस्थापक यशवंत शिरसाठ हेही प्रबळ दावेदार मानले जातात. शिवाय नगरसेवक हरीश भडांगे, रविकिरण घोलप, सुनील कोथमिरे, रामदास सदाफुले, दीपक वाघ, रवि पगारे यांनीही तयारी चालविली आहे. \मनसेही जोमातमागील विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराने तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती, तर २००९च्या लोकसभेत सेनेपेक्षा मनसेला अधिक मते मिळाली होती. त्यामुळे येथे पक्ष म्हणून नव्हे, तर व्यक्तीच्या नावे मनसेला मते मिळतात, हे सिद्ध झालेले आहे. मनसेचा करिश्मा तसाही राहिला नसला, तरी खुद्द राज ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्यामुळे त्या भांडवलावर मनसे येथे सेनेला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. मनसेकडून गतवेळचे उमेदवार राजू वैरागर यांचे नाव आहेच; शिवाय अमोल घोलप, प्रमोद साखरे यांचीही नावे आहेत. रिपाइंतील काही महत्त्वाकांक्षी नेतेही मनसेच्या गळाला लागण्याची शक्यता असून, त्यातील चेहराही उमेदवार ठरू शकतो. दावा निव्वळ प्रतिष्ठा आणि अस्तित्वासाठीचानगरपालिका काळापासून कॉँग्रेसची पाळेमुळे या मतदारसंघात रुजली असली, तरी गेल्या दोन तपांपासून कॉँग्रेसकडे उमेदवारच नसल्याची परिस्थिती आहे. राष्ट्रवादीने आणि अलीकडेच मनसेनेदेखील सेनेपुढे आव्हान उभे केले आहे. मात्र, परंपरागत कॉँग्रेसला या मतदारसंघात दिग्गज उमेदवारच नाही. यंदा कॉँग्रेसकडून माजी महापौर अशोक दिवे यांचे चिरंजीव राहुल दिवे, यापूर्वी नशीब आजमवणारे लक्ष्मण मंडाले, नितीन मोहिते यांची नावे चर्चेत आहेत. कॉँग्रेसचे विद्यमान नगरसेवक कन्हैया साळवे यांनी, तर भावी उमेदवार म्हणून मिरवणेही सुरू केले आहे.
आता नाही तर कधीच नाही
By admin | Published: July 03, 2014 10:14 PM