नाशिक : महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर तो घरपट्टी विभागाकडे पाठविण्यास होणारा विलंब लक्षात घेता आता नगररचनातून या दाखल्याचा प्रवास आॅनलाइन होणार असून, त्यामुळे योग्यवेळी करआकारणीदेखील करता येणार आहे. त्यामुळे घरपट्टी लागू करण्यासाठी महापालिकेचा मिळकत कराकडे तगादा लावण्याची आता गरज पडणार नाही.शहरात कोणीही बांधकाम केल्यास महापालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने परवानगी घ्यावी लागते. बांधकामाची परवानगी घेतल्यानंतर पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. हा मिळकतदाराला देतानाच त्याची एक प्रत विभागीय कार्यालयांकडील मिळकत करविभागाकडे पाठवली जाते. यामध्ये हस्तलिखित नोंदी घेऊन दाखले वितरित करण्यामध्ये विलंब होतो. तसेच सदरचे दाखले संगणकीय कार्यप्रणालीवर नोंद नसल्याने, त्यांचा हिशोब ठेवणे, कर निरीक्षकाकडे दाखले प्राप्त असूनदेखील प्राप्त दाखले करआकारणी होत नसल्याचे प्रशासनाला आढळले आहे.मिळकतधारकांना वेळेत कर निर्धारण केल्यास कराचा भरणादेखील वेळेत करणे मिळकतधारकांना शक्य होते, याचा विचार करून नगरनियोजन विभागाकडून वितरित होणारे दाखले, मिळकतधारकास वितरत करण्यापूर्वीच त्यांची नोंद मालमत्ता कराच्या कार्यप्रणालीवर घेण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजात सुलभता येईलच, परंतु दाखले घेऊन पुन्हा मिळकत कर विभागाकडे घरपट्टी लागू करण्याची गरज पडणार नाही.सुलभता येणारनगररचनाकडून वितरीत होणारे दाखले महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध असतील. त्यामुळे नागरिकांना त्याची माहिती मिळेलच, परंतु विभागप्रमुखांना कर निर्धारणाबाबतचे आढावा घेणे, जबाबदारी निश्चित करणे, वेळेत कर निर्धारण करून घेणे सुलभ होणार आहे.
आता पूर्णत्वाच्या दाखल्याचा प्रवास होणार आॅनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:36 AM