नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेले श्री महंत ग्यानदास आता कुंभमेळा संपल्यानंतर पुन्हा एकदा मूळ रूपात आले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंंह चौहान येण्यापूर्वी त्यांनी दिगंबर आखाड्यावर चांगलेच तोंडसुख घेत ‘पुढचे हिशेब उज्जैनमध्ये चुकते करू’ अशी थेट धमकीच देऊन टाकली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उज्जैनच्या कुंभमेळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आज साधुग्रामचा दौरा केला. त्यांच्या आगमनापूर्वी श्री महंत ग्यानदास यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिगंबर आखाड्याने कोणाला न सांगता ध्वज उतरवल्याबद्दल त्यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, दिगंबर आखाड्याची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वेळेआधीच ध्वज काढून त्यांनी अत्यंत चुकीचे काम केले आहे. तिन्ही अनी आखाड्यांनी एकत्र येऊन ध्वजारोहण केले होते. सर्वांनी एकत्र येऊनच ध्वज उतरवायचे असतात. त्याचा भोग, भंडारा करावा लागतो. दिगंबर आखाड्याला परंपराच माहीत नाहीत. कुंभमेळा निर्विघ्न पार पाडायचा असल्याने आपण इतक्या दिवस शांत बसलो होतो. आता मात्र उरलेले हिशेब उज्जैनमध्येच पूर्ण करू. दिगंबर आखाड्याला उज्जैनमध्ये प्रवेशही करू देणार नाही. सन २००७ मध्येही त्यांनी असाच त्रास दिला होता आणि याच रामकिशोरदास शास्त्रींनी मध्यरात्री येऊन माझी माफी मागितली होती. आता अधिक सहन केले जाणार नाही. मुळात दिगंबरचे महंत अस्सल नाहीत. आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा फैसला येथेच करायचा होता; पण निवडणुकीला घाबरून दिगंबरवाल्यांनी आधीच पळ काढल्याचा आरोपही ग्यानदास यांनी यावेळी केला.
...आता उज्जैनमध्ये हिशेब चुकता करू!
By admin | Published: September 20, 2015 11:19 PM