सिन्नर : आपल्या शेतातील पिकांची नोंद ७/१२ उताऱ्यावर अचूकपणे असावी असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटते. यासाठी शासनाने ‘ई-पीक पाहणी’ हा प्रकल्प सुरू केला असून, शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या पीक पाहणीसंबंधी माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा या संकल्पनेनुसार ई -पीक पाहणी ॲप उपलब्ध करून दिले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या ॲपच्या माध्यमातून १५ सप्टेंबरपर्यंत आपल्या शेतातील पिकाची नोंद ऑनलाइन करावी, असे आवाहन तहसीलदार राहुल कोताडे यांनी केले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती स्वत: भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ॲपद्वारे एका अँड्रॉइड मोबाईलवर २० खातेदारांची पीक पाहणी भरता येऊ शकते. यासाठीचे विकसित केलेले ॲप अत्यंत सहज, सोपे व सुलभ असून, त्याद्वारे ही पीक पाहणी नोंदवायची आहे. या ॲपद्वारे पीक पाहणी नोंदविण्याच्या कामी व्हिडिओद्वारे तसेच माहिती पत्रकाद्वारे प्रक्रिया समजावून सांगण्यात आलेली आहे. ई-पीक पाहणी ॲपमध्ये आपण भरलेली माहिती शासनाच्या विविध योजना, अनुदान वाटप, आपत्ती संबंधीची मदत यासाठी उपयोगात येणार आहे. १५ सप्टेंबरपर्यंत खरीप हंगामाची पीक पाहणी पूर्ण करण्यात येणार आहे.
चौकट-
पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणण्याची सुवर्ण संधी
सातबारा उताऱ्यावर पोटखराब क्षेत्र - अ हा प्रकार असेल आणि आपण ते क्षेत्र जमीन नांगरून किंवा सपाटीकरण करून लागवडीसाठी खाली आणले असल्यास ते क्षेत्र ‘लागवड योग्य पड’ क्षेत्रात नोंदणी केल्यास, त्या क्षेत्रावर देखील बँकेकडून पीक कर्ज मिळणार आहे. त्या क्षेत्रामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसानभरपाई मिळणार आहे. त्या क्षेत्रासाठी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेता येईल. त्या क्षेत्राचा देखील पीक विमा अर्ज भरताना समावेश करता येणार आहे.
------------------------
पीक पाहणी नोंद न केल्याने होणारे नुकसान आपले शेत पडीत दाखविले जाईल किंवा पेरणी झालीच नाही असे दाखविले जाईल. पुढील हंगामाकरिता कोणत्याही बँकेकडून पीक कर्ज घेताना अडचणी निर्माण होईल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही. जर शासनाद्वारे एखाद्या पिकाला आर्थिक मदत जाहीर झाली, तर आपण आपली पीक नोंदणी न केल्याने शासनाद्वारे मिळणारी मदत आपल्याला मिळणार नाही. जर शेतातील पिकांचे जंगली जनावरांमार्फत नुकसान झाले तर आपण पीक नोंदणी न केल्याने आपल्याला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळणार नाही.