नाशिक : प्रमुख राजकीय पक्षांमध्ये असलेला असंतोष आणि त्यामुळे सुडाचे राजकारण रंगण्याची शक्यता अधिक असताना या नाराजीचा फायदा उठवत आरपीआयने भिन्नपक्षीय पॅनलची तयारी चालविली आहे. केवळ एखाद्याच्या विरुद्ध लढण्यापेक्षा निवडून येणाऱ्या ठिकाणी इतरांना मदत करून त्या बदल्यात रिपाइंच्या विजयासाठी रिपाइंने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी कोणत्याही पक्षाबरोबर पॅनल करण्याचे सर्व पर्याय आरपीआयने खुले ठेवले आहेत. प्रसंगी रिपाइंला एखाद्या ठिकाणाहून माघारी घेण्याची तयारीदेखील दाखविली आहे. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय भूमिकांमुळे उमेदवार आणि त्यांच्या पक्षाला महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या आणि रिंगणाबाहेर असलेल्या नाराजांमुळेही यंदाची निवडणूक अनेकांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळे प्रभागातील पॅनल निर्मितीचेही समीकरणही महत्त्वाचे ठरणार आहे. या राजकीय घडामोडीत प्रतिस्पर्धी आणि तुल्यबळ यांची सांगड घालण्याचाही प्रयत्न केला जाईल, मात्र प्रामाणिकपणे ऐकमेकांसाठी कामे केली तरच विजयाचा मार्ग सुकर होणार असल्याने या अस्थिर राजकीय वातावरणात रिपाइंने इतर पक्षांना पॅनलची साद घातली आहे. रिपाइंच्या एक गठ्ठा मतदानावर पॅनलची रचना असल्यामुळे इतर पक्ष आकर्षित होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आरपीआयची आता पॅनलची तयारी
By admin | Published: February 06, 2017 11:21 PM