गणेशोत्सव, आगामी नवरात्रोत्सव, दीपावली तसेच महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता शहरात फलकबाजीला उधाण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे फलकबाजीवर नियंत्रण रहावे आणि कुठल्याहीप्रकारे कोणीही कोणाविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर अथवा चित्र असलेले फलक शहरात लावू नये, जेणेकरून कायदासुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल, यासाठी मनपा प्रशासनाने जाहिरातीसाठी परवानगी देताना संबंधित जाहिरातकर्त्याचा आलेला अर्ज व जाहिरातीचा आशय मंजुरीसाठी अगोदर पोलीस आयुक्तालयाकडे पाठविणे बंधनकारक राहणार आहेे. राजकीय, सामाजिक, व्यावसायिक अशा कुठल्याही प्रकारचे जाहिरात होर्डिंग्ज झळकविण्यापूर्वी पोलीस परवानगी बंधनकारक करण्यात येणार आहे.
होर्डिंग्ज लावताना त्यावर दर्शनी भागात मनपा, पोलीस यांचा परवानगी क्रमांकदेखील लिहिणे बंधनकारक राहणार आहे, अन्यथा सदर होर्डिंग्ज हे बेकायदेशीर समजण्यात येईल आणि मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून ते तत्काळ काढून नष्ट केले जाईल, तसेच पोलीस आयुक्तालयाकडून अशा व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही पाण्डेय म्हणाले. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होण्यास आळा बसेल तसेच अयोग्य होर्डिंग्ज शहरात झळकलेले पहावयास मिळणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याबाबत आयुक्तालयाकडून मनपा प्रशासनासोबत पत्रव्यवहार करण्यात आला असून, होर्डिंग्जच्या अधिकृत जागांची यादीदेखील मागविण्यात आल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.
--इन्फो--
मनपा निवडणूक होईपर्यंत ‘चमकोगिरी’ला चाप
शहरात होर्डिंग्ज लावण्यापूर्वी पोलीस आयुक्तालयाकडून परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या दोन दिवसांत आयुक्तालयाकडून काढली जाण्याची शक्यता आहे. होर्डिंग्जबाबतचा आदेश मनपा निवडणूक पार पडेपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शहरात आता ‘भाऊ’, ‘दादा’, ‘अण्णा’ यांची चमकोगिरीला चाप बसणार आहे.
--कोट--
शहराच्या कायदासुव्यवस्थेच्यादृष्टीने होर्डिंग्जचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या सुरू असलेला सणासुदीचा काळ, आगामी मनपा निवडणूक यामुळे होर्डिंग्ज लावण्याची परवानगी देण्यापूर्वी मनपाकडून संबंधितांचे अर्ज आयुक्तालयाकडे पाठविले जातील, आयुक्तालयाकडून फलकावर प्रदर्शित करावयाच्या मजकुराची शहानिशा करून योग्य ती खात्री करून परवानगी दिली जाईल. संबंधितांना परवानगी क्रमांक दिलेला असेल, तो त्याने त्याच्या होर्डिंग्जवर प्रदर्शित करणे अनिवार्य राहणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या दोन दिवसांत जारी केली जाणार आहे.
-दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त