नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याबाबत माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम अपयशी ठरल्यानंतर आता शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी नूतन आयुक्त अभिषेक कृष्ण यांना साकडे घातले आहे. त्याबाबतचे दस्तावेजासह निवेदन नुकतेच दातीर यांनी आयुक्तांना सादर केले.दिलीप दातीर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात भंगार बाजाराबाबतची कैफियत मांडली आहे. दातीर यांनी म्हटले आहे, गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजार हटविण्यासाठी सातत्याने मनपा प्रशासन, शासन आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा केला. न्यायालयीन लढाईत सर्वोच्च न्यायालयाने सदर अनधिकृत भंगार बाजार हटविण्याचे आदेशही दिले आहेत परंतु मनपा प्रशासन नाना कारणे देत कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. सदर भंगार बाजार हा अनधिकृत तर आहेच, शिवाय त्यामुळे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झालेला आहे. सदर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी घटना घडत आलेल्या आहेत. भंगार बाजार हटविण्याबाबत माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे सातत्याने दीड वर्षे पाठपुरावा करण्यात आला परंतु कधी सिंहस्थ कुंभमेळा तर कधी स्मार्ट सिटी या नावाखाली वेळकाढूपणा केला गेला. त्यामुळे आयुक्तांविरोधी उच्च न्यायालयात अवमान याचिकाही दाखल करण्यात आलेली आहे. नूतन आयुक्तांनी आता न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत भंगार बाजार हटविण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी दिलीप दातीर यांनी निवेदनात केली आहे. आयुक्त अभिषेक कृष्ण यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी पंकज दातीर, संतोष नागरे, सागर घाटोळ, चेतन सोनवणे, जयंत जोशी आदि उपस्थित होते.
भंगार बाजार हटविण्यासाठी आता नूतन आयुक्तांना साकडे
By admin | Published: July 17, 2016 12:34 AM