सातपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सहकारी बँकांमध्ये जमा झालेल्या मोठ्या रकमेची माहिती लवकरात लवकर सादर करावी, असे आवाहन आयकर निदेशक संजीव शंकर यांनी केले आहे. नाशिक आयकर विभागाच्या वतीने सातपूर येथील नाईस सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. शंकर यांनी सांगितले की, केंद्र सरकारने दि. ९ नोव्हेंबर रोजी चलनातील एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर दि. ९ नोव्हेंबर ते दि. ३१ डिसेंबर दरम्यान सहकारी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात चलनातील बाद झालेल्या जुन्या नोटांचा भरणा झाला आहे. याबाबतचा सविस्तर तपशील ३१ जानेवारीपर्यंत सहकारी बँकांनी आयकर विभागाला देणे अपेक्षित होते. मात्र बँकांनी अद्याप तपशील सादर केलेला नाही. सर्व सहकारी बँकांनी त्या काळात बचत खात्यात अडीच लाख रुपयांच्या वर रक्कम आणि करंट खात्यात साडेबारा लाख रुपयांच्या वर रक्कम जमा झाली असेल त्याची माहिती आयकर खात्याकडे सादर करावी, असेही आवाहन त्यांनी केले. आयकर अधिकारी नीता फडके यांनीही सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तपशील सादर करताना काय करावे, येणाऱ्या अडचणी, उपाययोजना यांचीही माहिती दिली. यावेळी आयकर अधिकारी सुनीता भालेराव, निरीक्षक प्रदीप सुबुद्धे, अमोल वल्टे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
आता सहकारी बॅँकांमागे ससेमिरा
By admin | Published: February 20, 2017 11:04 PM