नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करताना आता २०० वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाहाला परवानगी देण्यात आली असल्याने विवाह सोहळ्यात किमान कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांना तरी उपस्थित राहणे शक्य होणार आहे. तसेच या विवाह सोहळ्यांमुळे या क्षेत्राशी निगडित अर्थचक्रदेखील सुरळीतपणे सुरू होऊ शकणार आहे.
राज्य शासनाने दिलेल्या निर्णयानुसार खुल्या प्रांगणातील किंवा लॉन्सवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित आसनव्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने मात्र त्यातही जास्तीत जास्त २०० व्यक्ती इतक्या मर्यादेत उपस्थित राहू शकणार आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई तसेच संबंधित जागेचा अर्थात मंगल कार्यालय, हॉटेल्सवर परवाना रद्दची कारवाई करण्याचा इशारादेखील या आदेशात देण्यात आला आहे.
मंगल कार्यालयासाठी या आहेत अटी
सर्व संबंधितांचे लसीकरण अत्यावश्यक
कोणत्याही परिस्थितीत विवाह सोहळ्याशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे दोन लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित संलग्न संस्था, व्यवस्थापक, कर्मचारी यांचीही दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे, याबाबतचे व्हीडिओ रेकॉर्डींग तसेच मागणीनुसार सक्षम अधिकाऱ्याकडे त्याचा पुरावा उपलब्ध करून देणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यात कोणत्याही परिस्थितीत निर्धारित व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती बोलावणे शक्य होणार नाही.
मंगल कार्यालय चालकांना उत्साह
निदान ऑगस्टच्या मध्यापासून आता पुढील विवाहांना २०० नागरिकांची उपस्थिती शक्य होणार असल्याने काहीसा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाचा निर्णय स्वागतार्ह असून त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करू. तसेच भविष्यात त्यातही अजून थोडी सूट मिळणे आवश्यक आहे.
देवदत्त जोशी, प्रसाद मंगल कार्यालय
विवाहाला २०० नागरिकांची मुभा देण्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र, त्यातही शनिवार, रविवारी दिवसभर विवाहांना परवानगी मिळाल्यास ते नागरिकांच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर होईल. तसेच हळूहळू निर्बंध अजून शिथिल केले जातील, अशी अपेक्षा आहे.
सुनील चोपडा, चोपडा लॉन्स
बॅन्ड पथकांना रोजगार
५० नागरिकांच्या उपस्थितीतील विवाहाला कुणी बॅन्डवाल्यांना बोलावत नव्हते. त्यामुळे सर्वच बॅन्डवाल्यांचा आणि त्यात काम करणाऱ्या सामान्य वादकांचा रोजगार बुडाला होता. या शासनामुळे आता थोड्या फार प्रमाणात तरी रोजगार मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
नितीन देवरे, ओम ब्रास बॅन्ड
आमच्या वादकांना गत वर्षभरापासून काहीच काम उपलब्ध होत नसल्याने त्यांना कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा असा प्रश्न पडलेला होता. या निर्णयामुळे थोडीशी आशा निर्माण झाली असली तरी हा निर्णय किती काळ राहील याबाबत निश्चितता वाटत नाही.
रंजन गुप्ता, गुप्ता ब्रास बॅन्ड
विवाह मुहूर्त
विवाहाचे प्रमुख मुहूर्त हे १५ जुलैपूर्वीच होते. त्यानंतर पंचांगांतील मुहूर्त थेट १५ नोव्हेंबरनंतर १३ डिसेंबरपर्यंतच आहेत. मात्र, अधिक काळ लांबवल्यास विवाहात विघ्ने निर्माण होतात. तसेच भविष्यातील कोरोना परिस्थितीचाही अंदाज नसल्याने नागरिकांचा कोरोना कमी असल्याच्या कालावधीत विवाह उरकून घेण्याकडे कल वाढला आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये काही शुभ दिवसांनादेखील विवाह उरकून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.