लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या निमित्ताने एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, या अभियानामुळे एकाच ठिकाणी दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
त्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती असून त्यांच्या नियंत्रणाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हे समितीचे सदस्य सचिव असतील. शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान सुरु केले असून आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे या अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आहेत. बांधवांदिव्यांग मध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेक जण विभागीय स्तरावर तसेच शासकीय कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळे शासनानेच दिव्यांगांना आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी उपाययोजना केली आहे, त्यांना विविध योजनांचा लाभ तसेच त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनाने ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे.