नाशिक :मुस्लीम समुदायाकडून दरवर्षी 'हज-उमराह'च्या पवित्र धार्मिक यात्रा सौदी अरेबियाच्या 'मक्का-मदिना' शहरांमध्ये केली जाते. उत्तर महाराष्ट्रातून दरवर्षी सुमारे बारा ते पंधरा हजार मुस्लीम यात्रेकरु यात्रेसाठी रवाना होतात. नाशिकच्या ओझर विमानतळावरुन या यात्रेकरिता विमानांच्या उड्डाणाचा मार्ग मोकळा झाल्याचे हेमंत गोडसे यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. एचएएल व डीजीसीएकडूनदेखील याबाबत सर्व परवानगी प्रक्रीया पुर्ण झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमधील मुस्लीम समुदायालासुद्धा हज यात्रेकरिता नाशिकमार्गे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठावे लागते. यामुळे प्रवासाचा वेळ, खर्चदेखील वाढून गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. ओझर विमानतळ कार्यान्वित झाल्यापासून समुदायाकडून हज, उमराह या धार्मिक यात्रेकरिता थेट सौदीअरेबियासाठी विमानसेवा सुरु व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली होती. याबाबत गोडसे यांची समाजातील काही धर्मगुरुंनी भेट घेऊन निवेदनही दिले होते. राज्याचे अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक आणि अल्पसंख्यांक विभागाच्या सचिव जयश्री मुखर्जी यांच्याकडे पाठपुरावा केला. यामुळे दोन महिन्यांपूर्वीच हज टर्मिनलच्या यादीत ओझर विमानतळाचा समावेश व्हावा अशी शिफारस राज्याने केंद्राकडे केली होती. ओझर विमानतळाचा 'हज टर्मिनल'च्या यादीत समावेश करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने सकारात्मकता दर्शविली, असे गोडसे यांनी यावेळी सांगितले. यामुळे संपुर्ण उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम समुदायाला मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील हज यात्रेचा प्रारंभ होईपर्यंत ओझर विमानतळाचा टर्मिनलच्या यादीत समावेश झालेला असेल आणि येथून सौदीच्या दिशेने विमाने यात्रेकरुंना घेऊन उड्डाण करतील असा विश्वास गोडसे यांनी यावेळी व्यक्त केला.
...आता नाशिकच्या विमानतळावरुन होणार 'हज' यात्रेसाठी उड्डाण; उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम समुदायाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 3:21 PM
ओझर विमानतळावरून हज उड्डाण सुरु करण्यासाठी ओझर विमानतळ सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधांनी सुसज्ज असल्याचे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे. याबाबतचा अहवालदेखील एचएएल ओझर विमानतळ प्रशासनाने केंद्राच्या नागरी उडाण मंत्रालयाला पाठविला आहे.
ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम समुदायाला दिलासा'एचएएल'ची सकारात्मकता