महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी (दि. २९) यासंदर्भात आदेश दिले. स्वच्छ शहर सर्वेक्षणांतर्गत नाशिक शहराने आता स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. यात प्रशासनाने कमीत कमी कचरा खत प्रकल्पावर यावा, यासाठी लोकसहभागातून घरगुती कचऱ्याचे निर्मूलन करण्यावर भर देण्यात येत आहे. कारखाने, हॉटेल आणि मोठ्या गृहनिर्माण संस्थांना अगोदरच अशाप्रकारे सेंद्रिय खत तयार करणे सक्तीचेच आहे. मात्र, अन्य ठिकाणी देखील अशाच प्रकारे आहे त्याच ठिकाणी पालपाचोळा आणि कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येऊ शकते. नाशिकमध्ये अनेक नागरिक अशाप्रकारचे खत प्रकल्प तयार केले आहेत.
नाशिक महापालिकेच्या उद्यानात देखील अशाप्रकारे प्रत्येक उद्यानात सेंद्रिय खत तयार करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. नाशिकमध्ये महापालिकेची सुमारे साडेचारशे उद्याने आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात पालपाचोळा पडतो. तो घंटागाडीतून पाथर्डी शिवारात खत प्रकल्पावर नेऊन तेथे प्रक्रिया केली जाते. मात्र, आता आयुक्तांनी उद्यानातच खत प्रकल्प राबवण्याची सूचना केली आहे. सध्या चार उद्यानात अशाप्रकारे खत तयार केले जात आहे. आता मात्र सर्वच उद्यानात अशाप्रकारे कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येेणार असल्याने त्याच खताचा झाडांसाठी उपयोग देखील केला जाणार आहे.
इन्फो..
त्याच उद्यानासाठी खताचा वापर शक्य
नाशिक महापालिकेच्या वतीने उद्यानातील पालापाचोळ्यापासून खत तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यास मदत हेाईल. तसेच त्याच उद्यानासाठी खत देखील तयार होऊ शकेल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.