लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांची सुरक्षितता तसेच शाळाबाह्य प्रवृत्तींचा त्रास टाळण्यासाठी तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेतला जाणार आहे. एकूण ८६ शाळा इमारतींवर हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याशिवाय खासगी शाळांप्रमाणे गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातच मनपा शाळांनी मुलांना प्रवेश दिले आहेत. त्यामुळे सहा हजार मुले यंदा वाढली असल्याचा दावा प्रशासनाधिकाऱ्यांनी केला आहे.महापालिकेच्या १२८ शाळा आहेत, काही ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत तर काही ठिकाणी नाही. त्यातच एका शाळेतून तीन विद्यार्थी पळून गेल्याची तर अन्य एका शाळेत एक मुलगीही पळून गेल्याची घटना घडली होती. तर अंबड परिसरातील एका शाळेत काही रिक्षाचालकांनी येऊन शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी वाद घातला होता. या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. सामान्यत: एका इमारतीत तीन कॅमेरे बसवण्यात येणार असून, शाळा प्रवेशद्वार, क्रीडांगण आणि अन्य परिसर असे त्याचे स्वरूप असेल तसेच त्याचे नियंत्रण मुख्याध्यापकांच्या कक्षात असणार आहे. यामुळे शाळेत कोण येतो जातो किंवा काही गैरप्रकार सुरू असतील तर तातडीने दखल घेणे शक्य आहे. महापालिका शिक्षण मंडळाला मिळणाऱ्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत ही रक्कम सर्व शाळांना उपलब्ध करून देण्यात आली असून, शालेय स्तरावर कॅमेरे खरेदी केली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली.२०१०-११ या वर्षी महापालिकेच्या शाळांमध्ये ४३ हजार विद्यार्थी संख्या होती. मात्र कमी होत ती आता ३१ हजार ७०० इतकी आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवावी, असे उद्दिष्ट महापालिकेच्या सर्व शाळांना देऊन त्यानुसार मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आलाच शिवाय अन्य खासगी शाळांचे विद्यार्थी मनपाच्या शाळांकडे वळल्याने आतापर्यंत ३७ हजार इतके विद्यार्थी वाढले आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार आहे.
मनपा शाळांमध्ये आता तिसरा डोळा
By admin | Published: May 08, 2017 2:03 AM