नाशिक : इंधन महागाई, ऊर्जा महागाई तसेच उर्जेच्या स्त्रोतांसह सर्वत्र खासगीकरणाचे थैमान सुरू आहे. समाजाच्या सर्व जीवनावश्यक बाबींना धनिकांच्या हाती सोपविण्याचा या केंद्र सरकारचा डाव आहे. त्यामुळे केवळ शेतकरी किंवा कामगारांच्या विरोधात नव्हे तर हे सरकार सामान्यांच्या विरोधात, संविधानाच्या विरोधात असून हा समस्त जनतंत्रावरील हल्ला असल्याने त्याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन हल्लाबोल करण्याची हीच वेळ असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. यावेळी पाटकर यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते मोहन शर्मा यांना माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने आयोजित भव्य वीज कामगार मेळावा आणि माधवराव गायकवाड जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना पाटकर यांनी मोदींनी त्यांची खुर्ची सोडून संपूर्ण देश लिलावात काढला असल्याचे सांगितले. त्यामुळे आता केवळ शेतकरी किंवा केवळ कामगारांचे स्वतंत्र प्रश्न आणि स्वतंत्र आंदोलने करून चालणार नसून सर्वांनी मिळून एकत्रित लढाई लढावी लागणार आहे. या शासनाला सर्व शासकीय, निमशासकीय प्रकल्पांतील सर्व लाभ त्यांच्या जवळच्या उद्योजकांना द्यायचे असल्याने हा लढा आता जिद्दीने, चिकाटीने लढावा लागणार आहे. गत ५० वर्षात जितके बेरोजगार नव्हते, तेवढे बेरोजगार या काळात झाले असून सारं काही तंत्रज्ञान आणि खासगीकरणाच्या घशात ढकलायचे आहे. प्रत्येक क्षेत्रात कंत्राट, नफेखोरीतून कमाई काढण्याचे त्यांचे डावपेच आहेत. सत्कारार्थी मोहन शर्मा यांनी खासगी कंपन्यांनी मध्यप्रदेशात वीज पारेषण कंपनी केवळ १२०० रुपयांमध्ये विकत घेतली असून ही केवळ सुरुवात आहे. भविष्यात ते मध्यप्रदेशसह देशभरात वीजनिर्मिती कंपन्या हातात घेणार असल्याने आताच मोठा संघर्ष उभारुन हे सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन शर्मा यांनी केले. यावेळी कृष्णा भोयर, व्ही.डी. धनवटे, मिलिंद रानडे, अरुण म्हस्के, एम. आर. खतीब यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचीदेखील भाषणे झाली. राजू देसले यांनी सोमवारचा देशव्यापी बंद यशस्वी करण्याचा ठराव करीत त्यांचे विचार मांडले.
इन्फो
केवळ १ रुपया माझा
या सोहळ्यात मोहन शर्मा आणि श्रीमती रूपकमल शर्मा यांना भव्य पुष्पहार घालून गौरविण्यात आले. ३१ हजार रुपये सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी बोलताना शर्मा यांनी आयुष्यभराच्या संघर्षाबद्दल करण्यात आलेल्या या पुरस्काराचे मोल पैशात मोजता येणार नसून तो माझ्यासाठी अनमोल असल्याचे सांगितले. त्यामुळे या पुरस्काराच्या रकमेतील केवळ एक रुपया माझ्याकडे ठेवून उर्वरित सर्व निधी हा खंडकरी शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लढा दिलेल्या माधवराव गायकवाड यांच्या विधानसभेतील भाषणांच्या पुस्तकांच्या प्रती छापण्याच्या निधीसाठी अर्पण करीत असल्याचे शर्मा यांनी सांगताच त्यांच्या या कृतीला सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
इन्फो
जिद्दीसह चिवट प्रतिकाराची गरज
तीन शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्यास विरोध करतानाच २९ कामगारविरोधी कायदे मागे घेण्यास या शासनाला भाग पाडावे लागणार आहे. राज्यांना विचारात न घेता श्रमिक कायदे पुढे रेटले जात असल्याने आता केवळ जिद्द आणि चिवटतेच्या बळावरच केंद्र शासनाशी सर्व स्तरावरून संघर्ष करावा लागणार असल्याचे पाटकर यांनी नमूद केले.