लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारत प्रतिभूती-चलार्थपत्र मुद्रणालय मजदूर संघाच्या वतीने देशव्यापी संपाला पाठिंबा म्हणून दुपारच्या सुटीत निदर्शने करत केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही प्रेसमध्ये दैनंदिन कामकाज मात्र सुरळीत सुरू होते.केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी देशातील मान्यताप्राप्त संघटनांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला होता. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याने प्रेस कामगारांना संपात सहभागी होता आले नाही. मात्र या संपास पाठिंबा म्हणून हिंद मजदूर सभेशी संलग्न असलेल्या आयएसपी मजदूर संघाने दुपारी जेवणाच्या सुटीत आयएसपी गेट युनियन आॅफिस येथे निदर्शने करीत केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे म्हणाले की, केंद्र शासनाने कामगार विरोधी कायदे रद्द केले पाहिजे. देशभर कामगार विरोधी धोरण राबविले जात आहे. आरबीआयच्या व सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कॉईन्स व करन्सी क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योगांचे अस्तित्वच धोक्यात येऊ पाहात आहे. तेव्हा या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे गोडसे यांनी सांगितले. या मागण्यांबाबतचे निवेदन आयएसपी व सीएनपी मुद्रणालयाचे महाप्रबंधक यांना देण्यात आले.निदर्शने आंदोलनात मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष सुनील आहिरे, महाराष्टÑ राज्य हिंद मजदूर सभेचे उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, उत्तम रकिबे, शिवाजी कदम, जयराम कोठुळे, इरफान शेख, रमेश खुळे, गौतम थोरात, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, नंदू कदम, साहेबराव गाडेकर, भीमा नवाळे, अण्णा सोनवणे, विनोद लोखंडे, राजू जगताप, मनिष कोकाटे, ज्ञानेश्वर गायकवाड आदी सहभागी झाले होते.
नोट प्रेसमध्ये कामकाज सुरळीत; मात्र संपाला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 7:53 PM