नाशिक : अठरा वर्षावरील वयोगटासाठी नाशिकमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले असून पहिल्याच दिवशी नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. शहरातील सर्वच केंद्रांवर नागरिकांनी लस घेण्यासाठी रांग लावलेली दिसून आली.कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधक उपाय योजना म्हणून सर्वत्र लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी लस तुटवडा निर्माण झाला होता मात्र आता लस साठा भरपूर प्रमाणात उपलब्ध होत आहे त्यामुळे लसीकरण करण्यासाठी नागरिक मनपाच्या केंद्रावर गर्दी करत आहेत.पंचवटीत असलेल्या आठ लसीकरण केंद्रात नागरिकांना लस उपलब्ध असून सर्व केंद्र मिळून जवळपास दोन हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लस घेण्यापूर्वी सर्व नागरिकांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आली असल्याने ५० टक्के ऑनलाइन तर ५० टक्के प्रत्यक्ष हजर राहून नोंदणी करावी लागते. पंचवटीत इंदिरा गांधी, मायको रुग्णालय, हिरावाडी, तपोवन, मखमलाबाद, म्हसरूळ, रेडक्रॉस, नांदूर आदि केंद्रावर लसीकरण केले जाते. सध्या या केंद्रावर ३० वयोगटाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात आहे तर नागरिक मोकळ्या मनाने लसीकरण करण्यासाठी येतात असे नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी सांगितले.प्रत्येक केंद्रावर दैनंदिन लस साठा उपलब्ध होतो त्यानुसार नोंदणी केलेल्या नागरिकांना लस देण्याचे काम प्राधान्याने केले जात आहे.