नाशिक: तालुक्यातील जलालपूर गावातील आंबेडकरनगर भागातील पारसी बाबाच्या मळ्याजवळ दशरथ नारायण कचरे आपल्या शेळ्या चारत असताना एका शेळीवर बिबट्याने हल्ला करून त्याला ओढत नेत ठार केले. कळपात एक शेळी कमी असल्याचे शेळी चारणाऱ्याच्या लक्षात आल्याने त्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तळ्याजवळ अर्धवट मृत स्थितीत शेळी आढळून आली. परिसरातील काही महिला धुणी-भांडे करण्यासाठी गेल्या असता त्यांना बिबट्या पळताना दिसला. त्यांनी याची माहिती गावातील सरपंच व पोलीसपाटील यांना कळविताच वनविभागाला त्याची माहिती देण्यात आली.चांदशी गावातील रहिवासी असलेल्या दशरथ नारायण कचरे आपल्या शेळ्या चारण्यासाठी जलालपूर शिवारातील पारशी बाबाच्या मळ्याजवळ सकाळी सातच्या सुमारास गेला असता कळपातील एका शेळीवर झडप टाकून बिबट्याने त्याला ओढत नेत बाजूच्या शेतात घेऊन अर्धवट खाऊन सोडून दिले. बिबट्या तळ्या जवळून धूम ठोकताना धुणे- भांडे करण्यासाठी परिसरातील महिलांनी त्याला बघितल्यावर त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी या घटनेची माहिती जलालपूरचे सरपंच हिराबाई गभाले, भगवान गभाले, पोलीसपाटील पप्पू मोहिते यांना कळविली असता त्यांनी वनविभागाला याची माहिती कळवली. वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याच्या पायांचे ठसे असल्याचे खात्री केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून लवकरच पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले. घटनेचा पंचनामा अरुण रोकडे आणि भारत जाधव यांच्या समक्ष करून परिसरातील नागरिकांना सावध राहण्याबाबत सांगितले. परिसरातील बिबट्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता वनविभागाने ठोस कारवाई करीत बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जलालपूरचे उपसरपंच रमेश जाधव आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.