सिडको : सिडको, कामटवाडे, अंबड, पाथर्डी फाटा, मोरवाडी आदी भागात गेल्या महिनाभरापासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.सिडको परिसरात मांस विक्रेत्यांची अनेक भागात रस्त्यालगत दुकाने असून, या दुकानांसमोर भटकी कुत्री ठाण मांडून बसलेली असतात. सायंकाळी मांसविक्रेते मांसाचा उर्वरित भाग तेथेच टाकून देत असल्याने ही भटकी कुत्री मांस खाऊन हिंस्त्र बनतात. त्यामुळे वाहनचालकांच्या अंगावर धावून जातात. सायंकाळी अंबड व सातपूर भागातून मोठ्या प्रमाणावर कामगार परत येत असताना भटकी कुत्री रस्त्यात उभे राहून त्यांच्या अंगावर भुंकतात. तसेच सकाळी व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी जाणारे ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्यावरही भटकी कुत्री हल्ला करतात. या भटक्या कुत्र्यांना पायबंद घालावा, अशी मागणी भीमशक्ती संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर अविनाश आहेर, राम ठाकूर, ज्योती गोसावी, सूर्यकांत ठाकूर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सिडको परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:08 AM