नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपातही सोमवारी (दि.२६) बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. जिल्ह्यात काल बाधित संख्येने ३६८३ पर्यंत मजल मारली असली तरी त्यापेक्षा सुमारे सातशे अधिक म्हणजे ४३८२ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल जिल्ह्यात पुन्हा ग्रामीण भागात अधिक बळी गेले असून एकूण ३४ बळींची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २०१४, तर नाशिक ग्रामीणला १,५४० आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ५० व जिल्हाबाह्य ७९ रुग्ण बाधित आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ०९ ग्रामीणला २४, तर मालेगावला १ असा एकूण ३४ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणेसमोरदेखील बळी रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गत पंधरवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने चार हजारांवर राहिल्यानंतर पुन्हा बाधित संख्येची वाटचाल चार हजारांपेक्षा कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळू शकणार आहे. तसेच शहरातील बळींची संख्यादेखील पुन्हा एक आकडी झाल्याने शहरातदेखील काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
इन्फो
ग्रामीणचे बळी शहरापेक्षा अधिक
जिल्ह्यातील ३४ बळींपैकी सुमारे एक तृतीयांश म्हणजे २४ बळी हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नोंदले गेले आहेत. हे बळी शहरातील बळींपेक्षा जवळपास तिप्पट अधिक आहेत. ग्रामीण भागातदेखील बळींचे तांडव सुरूच राहिल्याने आरोग्य विभागाला आता ग्रामीण भागावरच अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या एकूण मृत्यूसंख्या ३३४५ वर पोहोचली आहे.
इन्फो
उपचारार्थी ४७ हजारांवर
जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्यादेखील सर्वाधिक स्तरावर असून, सध्या ४७ हजार ८३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक महापालिका क्षेत्रात २७ हजार ४०१, नाशिक ग्रामीणला १८ हजार ३६८, मालेगाव मनपाला १७५८ तर जिल्हाबाह्य ३११ रुग्णांचा त्यात समावेश आहे.