गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोरोनाचा कहर होता. नंतर संख्या कमी झाली असली तरी दुसरी लाट येऊ शकते, असे आरोग्य खात्याने अगोदरच जाहीर केले होते. मात्र, बाधितांची संख्या शहरात अगदी सहाशेपर्यंत आल्यानंतर मात्र बाजरात पुन्हा गर्दी उसळली. शासनाने निर्बंध शिथिल केल्याचा फायदा घेऊन लग्नसोहळ्यांना तसेच पर्यटनासाठीदेखील गर्दी होऊ लागली. त्याचे दुष्परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली. फेब्रुवारी महिन्यापासून शहरासह जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आणि एप्रिलमध्ये ही संख्या शिखरावर पोहोचली. एका दिवसात तब्बल सात हजार कोरोना बाधित आढळल्याने नाशिककरांचे धाबे दणाणले. मृत्युदरही वाढला त्यामुळे नागरिकही भयभीत झाले होते. त्या काळात पॉझिटिव्हिटी रेट सुमारे चाळीस होता. आता मात्र त्यात घट झाली आहे. आज तर पॉझिटिव्हिटी रेट सुमारे सतरा ते अठरा टक्के इतका कमी झाला आहे, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
शहरातील बाधितांची संख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी निर्धास्त राहून आरोग्य नियमांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन आयुक्तांनी केले. आणखी काही दिवसांनी रुग्णसंख्या यापेक्षा कमी झाल्यानंतरही गेल्या वेळेप्रमाणे नियमांचे उल्लंघन केले तर रुग्णसंख्या वाढण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
इन्फो...
शहरात आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या
१८२६
१ मे रोजी आढळलेले रुग्ण
२१७९
२ मे रोजी आढळलेले रुग्ण
११८४
२ मे रोजी आढळलेले रुग्ण