नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येने पाच हजारांचा टप्पा पार केला असताना आता बळींच्या संख्येने दोनशेचा टप्पा पार केला आहे. शनिवारी (दि. १८) शहरात आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या २०२ झाली आहे.शहरात कोरोनाचा उद्रेक पाहण्यास मिळत आहे. दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण आढळत आहेत. शुक्रवारी (दि.१७) एकाच दिवसात सर्वाधिक ४०३ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली. या ४०३ रुग्णांमुळे शहरात बाधितांच्या संख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी (दि. १८) शहरात १३८ कोरोनाबधित आढळल्याने बधितांची एकूण संख्याच ५ हजार ४११ झाली आहे. बाधितांच्या संख्येपाठोपाठ आता मृतांची संख्या झपाट्याने वाढत असून, शनिवारी एकाच दिवसात आठ रुग्ण दगावले आहेत. यात जुन्या नाशकात जुनी तांबट लेन, संत गाडगेबाबा पतसंस्थेचे समोर नाशिक येथील ५९ वर्षीय रुग्ण, पंचवटीत येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष, सिडकोतील उंटवाडी येथील कालिकापार्क येथील ६७ वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला तसेच विखे पाटीलनगर येथील ४५ वर्षीय पुरुष, देवळालीगाव, नाशिकरोड येथील ४५ वर्षीय रुग्ण, पंचवटीत म्हसरूळ येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष नाशिकरोड येथील लोखंडे मळा, कॅनॉलरोड नाशिक येथील ५७ वर्षीय वृद्ध महिलेचा तसेच पाथर्डी शिवार, नाशिक येथील ३१ वर्षीय रुग्णाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.---------------------नाशिक शहरात बाधित रुग्णांची संख्या ५ हजार ४११ झाली असली तरी आता पर्यंत ३ हजार ५७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या विविध रुग्णालयांमध्ये १ हजार ६३४ रुग्ण उपचार घेत आहेत. प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या घटली असून, सध्या २५६ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. आठ दिवसांपूर्वी शहरात ३०० प्रतिबंधित क्षेत्र होते.
शहरात कोरोना बळींची संख्या २०२ एकाच दिवसात आठ बळी : बाधित रुग्णसंख्या १३८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 9:40 PM