नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण कमी होत असल्याने गंभीर रुग्णांचे प्रमाणदेखील अवघे १५ टक्क्यांवर आले असून, त्यात तब्बल ८५ टक्क्यांनी घट झाली आहे. तर गत दोन महिन्यांच्या तुलनेत ऑक्सिजनचा वापर आता ७५ टक्के कमी झाला असून, आता केवळ ९ मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा परमोच्च बिंदू ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात गाठला गेला होता. त्यातही सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण तसेच गंभीर रुग्ण संख्येतही सर्वाधिक वाढ झाली होती. या दोन महिन्यातच कोरोना बळींच्या आकड्यातदेखील सर्वाधिक वाढ झाली होती. त्यामुळे त्याच कालावधीत जिल्ह्यात ऑक्सिजनच्या मागणीत सर्वाधिक वाढ नोंदवली गेली होती.
कोरोनाच्या काळात सर्वाधिक धोकादायक ठरलेल्या सप्टेंबर महिन्यांनंतर ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा आलेख कमी होऊ लागला आहे. त्यात प्रारंभी कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण हळूहळू खाली येऊ लागले. त्यानंतर दिवाळीच्या काळापर्यंत तर कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण शंभर ते दीडशेच्या टप्प्यात आले होते; मात्र उत्सवाच्या काळात बाजारात झालेली गर्दी आणि नागरिकांनी केलेल्या निष्काळजीमुळे त्यात दिवाळीनंतर वाढ होऊ लागली. दिवाळीनंतर काही दिवस ३०० ते ४०० रुग्णांपर्यंत हे प्रमाण पोहाेचले होते; मात्र त्यातही डिसेंबरमध्ये घट येऊ लागली असून, दररोज सुमारे २०० ते २५० रुग्ण बाधित आढळून येत आहेत.
इन्फो
दाखल होणाऱ्यात गंभीर रुग्ण अत्यल्प
नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प झाले असून, सद्यस्थितीत ते १० ते १५ टक्क्यांवर आले आहे. जे रुग्ण आधीपासून अन्य व्याधींनी ग्रस्त आहेत, तशा कोमॉर्बिड रुग्णांमध्येच तसेच विविध व्याधींनी पूर्वीपासून आजारी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्येच गंभीर होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
इन्फो
ऑक्सिजन सिलिंडरचा वापर एक चतुर्थांश
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक ऑक्सिजनची गरज लागली होती. ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेडची काहीशी कमतरता भासू लागली हाेती. त्यावेळी जवळपास ३६ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासली होती. त्या तुलनेत आता जिल्ह्यात हे प्रमाण ९ मेट्रिक टन ऑक्सिजनपर्यंत खाली आले आहे.
कोट
दिवाळीनंतर कोराेनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेवर सर्व यंत्रणा अलर्ट आहे. सध्या कोरोना आटोक्यात असला तरी थंडी वाढल्याने दक्षता वाढविण्यात आली आहे. सध्या गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने ऑक्सिजनचे प्रमाणदेखील सप्टेंबरच्या तुलनेत एक चतुर्थांश आहे.
डॉ. अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी.