वडांगळी : अखिल भारतीय बंजारा समाजाचे आराध्यदैवत असलेल्या येथील सतीमाता - सामतदादा यात्रोत्सवावर यंदा दुष्काळाचा परिणाम जाणवून आला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा बंजारा भाविकांची संख्या घटल्याने व्यापाऱ्यांचा हिरमोड झाला. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सुमारे २० हजारांहून अधिक भाविकांनी सतीमाता व सामतदादा चरणी लीन होत दर्शन घेतले. नवसपूर्तीसाठी सोमवारी सुमारे दीडशे बोकडांचा बळी देण्यात आला.रविवारी रात्री १० वाजून ३३ मिनिटांनी माघ पौर्णिमेस प्रारंभ झाला. त्यामुळे आज पौर्णिमा असल्याने भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र आज दिवसभर पौर्णिमा असताना भाविकांची गर्दी कमी दिसून आली.सोमवारी नवसपूर्तीसाठी बोकडबळीचे प्रमाण कमी होते. पहाटे ५ वाजता आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते सामतदादा यांची तर पंचायत समितीच्या सभापती संगीता काटे व विजय काटे यांच्या हस्ते सतीमातेची महापूजा करण्यात आली. यावेळी देवस्थान संस्थानचे अध्यक्ष अशोक चव्हाण, उपाध्यक्ष रमेश खुळे, विश्वस्त उत्तम कुलथे, दिनकर खुळे, रमेश राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक खुळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, उपसरपंच नानासाहेब खुळे, ग्रामपंचायत सदस्य शरद खुळे उपस्थित होते.गावची गावठी पब्लिक ट्रस्टच्या वतीने कातडी लिलाव करण्यात आला. या लिलावाची बोली एक लाख सात हजार रुपयांना गेली. गावातील लियाकत शेख यांनी सदर लिलाव घेतला. भाविकांकडून कातडी खरेदी करताना शेख यांना वेगळा मोबदला द्यावा लागणार आहे. दुपारी ४ वाजता सतीमाता व सामतदादा काठी व मुखवट्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)
दुसऱ्या दिवशी भाविकांच्या संख्येत घट
By admin | Published: February 22, 2016 10:20 PM