आरटीओ कार्यालयाबाहेर वाहनांच्या रांगा
नाशिक : आरटीओ कार्यालयात पासिंगसाठी आलेली अवजड वाहने कार्यालयाबाहेरील रस्त्यावर रांगा लावत आहेत. सकाळी येथे मालवाहू वाहनांचे पासिंग केले जाते. जिल्हाभरातील अनेक वाहने या ठिकाणी येत असल्याने कार्यालयाच्या बाहेर अवजड वाहनांची रांग लागलेली असते. यामुळे मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्य अन्य वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मैदानाचे काम अजूनही अपूर्ण
नाशिक : सातपूरच्या अशोकनगर येथे जाधव संकुल येथील तुळजाभवानी मंदिरालगतच्या मोकळ्या भूखंडावर मैदानाचे काम अजूनही अपूर्णावस्थेत आहे. या मैदानाचे काम कधी सुरू होईल याबाबतची खेळाडूंना प्रतीक्षा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खेळाडूंकडून मैदान पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.
चक्कर येऊन पडल्याने वृद्धाचा मृत्यू
नाशिक : घरात चक्कर येऊन पडल्याने ७१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मखमलाबाद येथील सुभाष रामभाऊ लष्करे असे मृत वृद्धाचे नाव आहे. डोक्याला मार लागल्याने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
टाकळी रस्त्यावर वाढली वर्दळ
नाशिक: टाकळीपासून औरंगाबाद रोडकडे जाण्यासाठी असलेल्या टाकळी मार्गावरील वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. औरंगाबाद तसेच नाशिक-पुणे महामार्गावरील वाहनांना द्वारका चौकातून जाण्यास बंदी असल्याने टाकळीमार्गे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक वाढली आहे.
टाकळी मार्गावर मिनी इंडस्ट्री
नाशिक: टाकळी ते हॉटेल मिर्ची मार्गावर अनेक लहान-मोठ्या उद्योगांनी आपली गुदामे थाटली आहेत. मार्बल कारखाने, नव्या गाड्यांचा डेपो, फेब्रिकेशन वर्क, शोरूम सर्व्हिस स्टेशन तसेच शालेय वाहनांसाठीचे गॅरेज असे अनेक लहान-मोठे उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळे या मार्गाला मिनी इंडस्ट्रीचे स्वरूप आले आहेत.