नाशिक : कोरोनाच्या काळात सर्वत्र जनजीवन विस्कळीत होऊन आरोग्य व्यवस्था कोरोनाचा अटकाव करण्यात व्यस्त असताना जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने केलेल्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमालीची घटली आहे. गेल्या तीन महिन्यांत तीव्र कुपोषित असलेल्या सुमारे पाचशे बालकांचे वजन वाढून त्यांची प्रकृती सुदृढ झाली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात कुपोषित बालकांच्या आरोग्याचा तसेच कुपोषणाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना जिल्हा परिषद प्रशासनाने कुपोषणावर लक्ष केंद्रित करून विविध प्रयत्नांना चालना दिली होती. अंगणवाडीतील बालकांना घरपोच पोषण आहार देण्याबरोबरच त्यांच्या वजनाची नियमित तपासणी तसेच आरोग्य तपासणी करण्यात आली. याकामी शासनाच्या योजनेबरोबरच ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोगातून पोषण आहाराला निधी उपलब्ध करून दिला होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महिला व बाल कल्याण अधिकारी दीपक चाटे यांनी सातत्याने ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करून कुपोषण कमी करण्यासाठी ग्रामसेवकांचीही मदत घेतली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या काळात मध्यम व तीव्र कमी वजनाचे तसेच तीव्र व मध्यम गंभीर कुपोषित असलेल्या बालकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. बालकांबरोबरच गरोदर व स्तनदा मातांचेही पोषण या काळात करण्यात आले असून, त्यांना उकडलेला बटाटा, खाण्याचे खोबरेल तेल, मोड आलेले कडधान्य, गूळ, शेंगदाणे हा पोषण आहार देण्यात आला तर चौरस आहाराच्या माध्यमातून कुपोषित बालकांना अंडी, केळीचे वाटप करून त्यांचे वजन वाढविण्यात आले. गेल्या तीन महिन्यांत तीन लाख ३२ हजार ३५५ बालकांचे वजन घेण्यात आले असून, त्यातून कुपोषणावर मात करण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. चौकट====
अशी घटली बालकांची संख्या
* मध्यम कमी वजनाचे-४४३०
* तीव्र कमी वजनाचे-१७८६
* तीव्र गंभीर कुपोषित-४९८
* मध्यम गंभीर कुपोषित-१३५७