नाशिक : वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांतील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्येत अकराने वाढ होऊ शकते. त्यामुळे १२२वर असलेली नगरसेवक संख्या आता १३३ पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नव्या पद्धतीत ३० हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असू शकतो.
मुदत संपत आलेल्या राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या प्रभागरचनेत राज्य सरकारने बदल केले असून, नाशिक महापालिकेत चारऐवजी तीन नगरसेवकांचा प्रभाग असणार आहे. त्यानुसार तयारी सुरू झाली असतानाच आता महापालिकांतील नगरसेवकांची संख्या वाढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महापालिकेत सद्यस्थितीत १२२ नगरसेवक आहेत. तीन सदस्यांचे चाळीस तर दोन सदस्यांचा एक असे एकूण ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले होते. कोरोनामुळे सन २०२१ मध्ये जनगणनेचे काम पुढे ढकलण्यात आल्याने सन २०११च्या लोकसंख्येप्रमाणे प्रभागरचना तयार करण्याचे काम सुरू होते. मात्र, राज्य सरकारने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकसंख्या वाढल्याने पंधरा टक्के वाढ गृहीत धरून नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेत आता तीन सदस्यांचे ४४, तर एक सदस्यीय एक ४५ प्रभाग तयार होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या आता १३३ वर जाणार आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता ३० हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असणार आहे.
--------------
अंतिम प्रभागरचना २२ नोव्हेंबरनंतरच
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन सदस्यीय प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, आबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल असून, त्यावर २२ नोव्हेंबरला अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महापालिकेची प्रभागरचना अंतिम होऊ शकणार आहे.